सातपूर : देशी बनावटीच्या पिस्टल मधून छातीत गोळी झाडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर परीसरात शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रोहित राजेंद्र नागरे (वय २८ रा.शिवनेरी चौक,आठ हजार वसाहत,सातपूर कॉलनी ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत रोहित हा शुकवारी (दि.१२) रात्री बारा वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता आपली दुचाकी पल्सर (एमएच.१५ एफजे ४६८७ ) घेवून घराबाहेर पडला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी (दि.१३) सातपूर औद्योगिक वसाहत व भवर मळा परिसरातील नाल्या शेजारील रस्त्याच्या कडेला रोहितचा मृतदेह आढळून आला. रोहितच्या छातीत गोळी लागली असून देशी बनावटी पिस्टल मृतदेहजवळच पडलेले होते. घटनास्थळावरून देशी बनावटीची पिस्टल व त्याची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पिस्टल मध्ये झाडलेली एकच गोळी होती. रोहित यांचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नसून कोणाशीही वाद नसल्याची माहिती नातेवाईकांनी यावेळी दिली. पोलिसांनी शेवटचे फोन कॉल्स व इतर माहिती घेण्यासाठी रोहितचा मोबाईल ताब्यात घेतला असून मोबाईल मधील व्हॉटस अँप स्टेट्स तपासले असता सर्व स्टेट्स प्रेमभंग अथवा प्रेमप्रकरनातून आत्महत्या झाल्याचे दिसून येत असल्याने सातपूर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितने आत्महत्या केली की कोणी आत्महत्या चा बनाव करून हत्या केली यांचा अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, गंगापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, प्रभागाचे नगरसेवक सलीम शेख यांनी भेट देत माहिती घेतली.