रिकव्हरी करणाऱ्या फायनान्स कंपन्यावर कारवाई करा – नगरसेवक सलीम शेख
नाशिक – सातपूर येथील एका ४२ वर्षीय व्यावसायिकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. योगेश उर्फ राजु हनुमंत जाधव (वय ४२, रा. सातपुर कॉलनी श्रीकृष्णनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. जाधव यांचे आनंद छाया परिसरात मोबाईलचे दुकान आहे. जाधव यांनी याने शुक्रवारी पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे. सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान, मयत जाधव यांना एका खाजगी फायनान्स कंपनीचे लोक वारंवार फोन करुन वसुलीसाठी धमकी देत असत, अशी प्राथमिक माहीती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे जाधव याने प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात रंगली होती. दरम्यान, रिकव्हरी न करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही अनेक खाजगी फायनान्स कंपन्या रिकव्हरी करताना दिसून येत आहे अशा फायनान्स कंपन्यावर कारवाई करा अशी मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी निवेदनाद्वारे सातपूर पोलिसांकडे केली आहे.