लखनऊ ः नागरिकता संशोधन कायद्याला विरोध करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आता देशात हिंसाचार पसरवण्याचा कट करत असल्याचं उघड झालं आहे. पहिल्यांदाच त्यांचा दहशतवादी चेहरा समोर आला आहे.
वसंत पंचमीला लखनऊमध्ये हिंदू संघटनांकडून होणार्या कार्यक्रमांमध्ये तसंच महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यासाठी पीएफआयचे दोन दहशतवादी केरळमधून लखनऊला पोहोचले होते. परंतु ते त्यांच्या हल्ल्यापूर्वीच स्पेशल टास्क फोर्सनं (एसटीएफ) दोन्ही संशयितांना अटक केली आहे. एसटीएफनं त्यांच्याकडून हत्यारं आणि स्फोटकं जप्त केली आहेत. पीएफआयच्या निशाण्यावर अनेक मोठे नेते होते. देशातल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांची हत्या करण्याचाही त्यांचा हेतू होता.
अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं, की पीएफआयचा कमांडर केरळचा रहिवासी अन्सद बदरुद्दीन आणि फिरोज खान यांना मंगळवारी (१६ फेब्रुवारी)
सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कुकरेल चौकाजवळ अटक केली. देशात विविध ठिकाणी एकत्रितरित्या दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, असं त्यांच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे. दोन्ही संशयित वसंत पंचमीच्या दिवशी स्फोट घडवून आणण्याच्या कटात सहभागी होते.
फिरोज खान युवकांना हत्यारं चालवण्याचं तसंच स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण देत होता. हा संपूर्ण कट आखण्यासाठी परदेशातून पैसे पुरवले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही संशयितांकडे हिंदुत्वादी संघटनांच्या नेत्यांची यादी मिळाली आहे. अनेक कागदपत्रे मल्याळम भाषेतील आहेत.
लखनऊला आल्यानंतर काही युवकांना त्यांनी स्फोटकंही वाटले होते. त्या युवकांचा शोध सुरू आहे. दोन्ही संशयितांविरोधात लखनऊच्या एसटीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना बुधवारी सकाळी लखनऊच्या न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे. दोघांना पोलिस कोठडीत घेण्याची कयारी करण्यात आली आहे.
हत्यारांचा मोठा साठा जप्त
अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी एसटीएफच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली. दोन्ही संशयितांकडून १६ हाय एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस, ३२ पिस्तुलं, ७ काडतुसं, ४८०० रुपये, पॅन कार्ड, चार एटीएम कार्ड, दोन डीएल, दोन पेन ड्राइव्ह, एक मेट्रो कार्ड आणि १२ रेल्वे तिकिटं जप्त करण्यात आली आहेत. दोघांकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्याआधारे त्यांची चौकशी सुरू आहे.