दिंडोरी –राज्यात मागच्या वर्षीच्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांना घातले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघामध्ये सोमवारी एक अनौपचारिक बैठक झाली. त्यामध्ये यांच्याकडे साखर कारखान्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.यावेळी उपाध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले की, यंदा राज्यात ९०० लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. मागच्या हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात यंदाच्या १०० लाख टन साखरेची भर पडणार आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पुढच्या हंगामात अधिक ऊस असणार आहे. वाढत्या साखर साठ्याची मोठी समस्या राज्यात उद्भवली आहे. यावर मार्ग काढावा, अशी मागणी आम्ही शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे श्रीराम शेटे यांनी सांगितले.
२ ऑक्टोबर राजी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे साखर संघाकडून शरद पवार, बैठक आहे. त्या बैठकीत साखर साठ्यावर मार्ग काढण्यासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पवार यांच्या हस्ते साखर संघात नव्याने बनवण्यात आलेल्या बँक्वेट हॉलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते. १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू होत आहे. किमान १९५ कारखाने चालू होणे आवश्यक आहे. तसेच यंदा गाळप घटवण्याची गरज असून इथेनॉल निर्मितीला अधिक चालना दिली पाहिजे अशी विनंती पवार यांच्याकडे केल्याचे शेटे यांनी सांगितले.