पिंपळनेर, ता. साक्री – धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरातील स्टेट बँकेत व्यवहारासाठी गेलेल्या पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांना बँक अधिकारी व कर्मचा-यांनी योग्य वागणूक दिली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे आदिवासी संघटना व तालुका वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिका-यास घेराव घातला. अखेर बँक अधिकाऱ्याने माफीनामा लिहून दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
प्रतिभा सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेत मी गेले होते. बराच वेळ झाला तरी काम होत नसल्याने बँक अधिका-यांची भेट घेतली. त्यांनी सुरुवातीला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अरेरावीची व उडवाउडवीची उत्तरे दिली. सभापती महिला असतानाही अपमानजनक वागणूक दिली.
या प्रकाराची दखल घेत आदिवासी बचाव संघटना व वाहतूक तालुका सेनेने बँकेत धाव घेऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. तसेच अधिकाऱ्यास घेराव घातला. यावेळी बँकेत आलेल्या पेन्शनधारक, कृषिविषयक प्रकरणाचा भरणा करणा-या खातेदारांनीही त्यांच्या समस्या मांडल्या. अनेक ग्राहकांनी बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या तक्रारींद्वारे अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर बँक अधिकाऱ्यांने प्रसंगावधान राखून माफीनामा लिहून देत प्रकरणावर पडदा टाकला.
यावेळी माजी सभापती टिकाराम बहिरा, तालुका अध्यक्ष वाहतूक सेना अनिल पवार, सुनिल पवार, आदिवासी बचाव तालुकाप्रमुख गणेश गावित, आदिवासी बचाव तालुकाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, शिवसेना शिव वाहतूक उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर पगारे, उपशहर प्रमुख बबलू पुरानीक, नवेनगर सरपंच मन्साराम भोये, पिंपळनेर तालुका प्रमुख हिम्मत साबळे, साक्री तालुका प्रमुख पंकज मराठे, किशोर वाघ, पंकज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
बघा व्हिडिओ