अक्षय कोठावदे, पिंपळनेर, ता. साक्री
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासह पश्चिम पट्टयात शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला आहे. पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात तब्बल तीन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, कांदा, बाजरी, भाजीपाला, मका आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे घरांचेही नुकसान झाले आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून तीव्र उकड्याने नागरिक त्रस्त होते. या पावसामुळे उकड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, मालमत्तेची व शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करुन सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.