नागरिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर झाले संतप्त
पिंपळनेर – शासनाने एक मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर
पहिल्याच दिवशी कोव्हॅक्सीन लसीचे ४०० डोस शनिवारी प्राप्त झाले.
लसीकरणासाठी पहिला दिवस असल्याने १८ ते ४४ या वयोगटातील तरुण-तरुणी व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी लसीकरण केंद्रावर झाली. यातून अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लसीकरण केंद्रावर सकाळी सहा वाजेपासून लस घेण्यासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लवकरात लवकर मिळावी या उद्देशाने शेकडोची उपस्थिती दिसून आली होती मात्र नऊ वाजेनंतर देखील लसीकरण सुरू न झाल्याने अनेकांचा संताप अनावर झाला. काही वेळा तर लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात
वादाचे प्रसंग निर्माण होऊन बाचाबाची झाली.
अखेर १२.३० वाजता लसीकरणाला सुरुवात झाली.यामुळे शहरात अजून लसीकरण केंद्र वाढवुन कोरोनाला पोषक ठरू शकणारी ही गर्दी कमी करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे .एक मेपासून अठरा वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वत्र लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते याची कल्पना प्रशासनाला असतांनाही नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर देखील लस घेण्यासाठी नागरिकांची पहिल्याच दिवशी तुफान गर्दी झाली व अक्षरशः अनेकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये तरुणांची व महिलांची संख्या लक्षणीय आहे. लसीचा पुरवठा होत असला तरी लसीकरणाला तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे.तर पहिल्याच दिवशी शेकडोच्या संख्येने लस घेणाऱ्यांची गर्दी झाल्याने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र ‘कोरोना हॉटस्पॉट’ होऊ शकते असे विदारक चित्र आज शनिवारी सकाळपासून दिसत होते.