सांस्कृतिक ताल हरपला!
ज्येष्ठ तबलावादक, कलाशिक्षक नवीनचंद्र तांबट यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे सातत्याने योगदान होते. चारच महिन्यांपूर्वी त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली होती. हसऱ्या चेहऱ्याने त्यांचा सर्वत्र वावर असायचा.दिग्गज कलावंतांशी त्यांचे ऋणानुबंध होते तसेच ते लहानांबरोबरही समरस होत.उत्कृष्ट कलाकार असूनही त्यांचे पाय कायमच जमिनीवर होते.कोणत्याही गटातटाच्या राजकारणात ते कधीच अडकले नाहीत. त्यामुळेच ते अजातशत्रू होते. तांबट सरांच्या निधनाने सांस्कृतिक ताल हरपला.
तबलावादक नवीन तांबट आपल्या नावाप्रमाणेच नित्यनूतन कल्पना राबवायचे. सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात दमदार वाटचाल केली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या फिल्म
कंपनीत तांबट सरांचे वडील रतनलाल तांबट कलादिग्दर्शक होते. सहा भावंडांमध्ये नवीन हे पाचवे अपत्य. त्यांचे मोठे तीन भाऊ शिल्पकलेच्या क्षेत्रात ‘तांबट बंधू ‘ या ब्रॅण्डनेमने प्रसिद्ध झाले. लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. घराजवळच्या रुंगटा हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी क्राफ्ट टीचर्स कोर्स प्रथम श्रेणीत पूर्ण केला.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ख्यातनाम पेठे हायस्कूलमध्ये ते कलाशिक्षक म्हणून जून १९७० मध्ये रुजू झाले. कलेकडे ओढा असल्याने ते बालपणीच तबला शिकून पुढे त्यात पारंगत झाले. नोकरी सांभाळून ते तबलावादन, साथसंगत यात रममाण होत. निगर्वी, लाघवी स्वभावाने सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले. ५० वर्षे ते अथकपणे कार्यरत होते. स्वतः उत्तम तबलावादक असूनही त्यांनी तालवाद्यांची संगत करण्यात कधी कमीपणा मानला नाही.सांस्कृतिक कार्यक्रमातील त्यांचा वावर सर्वांना प्रोत्साहन देणारा असायचा.
पेठे हायस्कूलमधील ज्येष्ठ सहकारी शिक्षक व संगीतकार बाळ भाटे,गायक अनंत केळकर यांचे मार्गदर्शन तांबट सरांना कायम मिळाले. सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी, नियोजन, विद्यार्थ्यांकडून गाणी बसवून घेणे व सादरीकरण यात त्यांचा पुढाकार असायचा. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मलाही लाभले. पेठे हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असायची. तांबट सरांचा चैतन्यमय सहभाग त्यात असायचा. कोणत्याही कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय ते कधीच घ्यायचे नाहीत. आपण सर्वांनी मिळून केले असेच ते नेहमी म्हणत. हे त्यांचे मोठेपण त्यांनी अखेरपर्यंत जपले.एकेकाळी पेठे हायस्कूल हे नाशिकचे मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र होते.
लोकहितवादी मंडळाचे कार्यक्रम, सराव शाळेच्या प्रांगणात होत. त्यावेळी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर, नाटककार वसंत कानेटकर उपस्थित रहात. तांबट सर तबलावादनाबरोबरच गरजेनुसार कोंगो बोन्गो, नाल, ढोलकी ही वाद्येही लीलया वाजवत. संगीतकार वसंत देसाई, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, यशवंत देव अश्या अनेक थोरांच्या मैफलीत त्यांनी साथसंगत केली. केवळ नाशिक, परिसर नव्हे तर राज्यभरात जेथे जेथे संधी मिळेल तेथे ते जात व आपल्या कलाकौशल्याचा ठसा उमटवत. त्यातून अनेक संस्थांशी त्यांनी आपुलकीचे नाते जोडले व शेवटपर्यंत निभावले.
कागदोपत्री सरांचे नाव नवीनचंद्र असले तरी नवीन या नावानेच ते सुपरिचित होते. नवा उत्साह, नवा जोश, नवी उमेद,नवे संकल्प व संकल्पना यांनी ते आपले नाव कायमच सार्थ करीत राहिले.अत्यंत शांत स्वभाव, सदैव हसतमुख असणाऱ्या तांबट सरांना कधीही चिडलेले, संतापलेले, रागावलेले कोणीच पाहिले नाही. विद्यार्थ्यांशीही ते आपुलकीच्या, मैत्रीच्या नात्याने वागायचे. तरुणपणात गायिका शुभदा बाम यांच्याशी नवीन तांबट यांचे सूर जुळले. दोघे विवाहबध्द होऊन तालासुरांची गट्टी जमली. दोघांनी स्वरदा सुगम संगीतवर्गाची स्थापना केली.
नवोदित गायक -वादकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यातून संगीतक्षेत्रात अनेक उमदे गायक, वादक उदयाला आले. नावारुपाला पोहोचले. सरांनी शाळेतील तर शुभदाताईंनी मर्चंट्स बँकेतील आपापली नोकरी सांभाळत अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. भावगीते, भक्तिगीते, सुगमसंगीत यांची मेजवानी रसिकांना दिली. मुलगी गीतांजली हिने आईकडून गायनाचा वारसा घेतला तर मुलगा निनाद तबला व तालवाद्यांमध्ये पारंगत झाला. हा चौकोनी कलाकार परिवार नवनवीन कल्पना राबवून रसिकांना कायम आनंद देत राहिला. आपली संगीतसाधना करीत कलाकार, रसिक घडवत राहिला. पत्रकारितेमुळे अनेक कार्यक्रमात सरांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आवर्जून कौतुक करायचे. पाठीवर थाप देऊन नवीन ऊर्जा द्यायचे. सर सत्तर वर्षांचे झाले आहेत यावर विश्वास बसणार नाही असाच अखंड उत्साहाचा झरा शेवटपर्यंत वहात राहिला. त्यांच्या कलात्मक स्मृतींना आदरांजली.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
तांबट सर फक्त तबलावादन, हस्तकला इतक्यापुरतेच मर्यादित नव्हते. निवृत्तीनंतरही शालेय व्यवस्थापनात त्यांचा सहभाग होता. बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले. शिक्षण मंडळाची निवडणूकही त्यांनी लढवली होती.नाविन्यपूर्ण प्रचाराने तांबट सरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अगदी विरोधी उमेदवारांच्या घरी जाऊन गप्पा मारल्या. कुठेही कटुता न येऊ देता विजय मिळवला. पदाधिकारी झाल्यावर कायमच संस्थेचे व शाळेचे हीत जपले. कोणाशीही मनभेद होणार नाही याची दक्षता घेतली.
आताही ते नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यात सहभागी अशा स्वभावामुळेच त्यांचा मोठा लोकसंग्रह होता. मनमोकळ्या वृत्तीमुळे त्यांना अहंभाव कधी शिवला नाही. आदर्श गुरु, कलाकाराचा धर्म त्यांनी निग्रहाने जपला. सांस्कृतिक – संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल तांबट सरांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांचा गौरव झाल्यामुळे खरंतर त्या पुरस्कारांनाच मोठेपण मिळाले. महिन्याभरापूर्वी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेतर्फे पुरस्कार जाहीर झाला. मात्र तो स्वीकारण्यासाठी तांबट सर आपल्यात नाहीत.