पुणे – गणित आणि संगीत यांच्यातील दुवा सर्वांसमोर आणावा व गणिताविषयी जनमानसात असणारे गैरसमज दूर व्हावे यासाठी अंकनाद या ऍपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय हा वेबिनार होणार आहे. संगीताची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी ही पर्वणी ठरणार असून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, संगीतकार अशोक पत्की, कीर्तनकार चारुदत्त आफळे असे दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत.
तीन दिवसीय वेबिनारमध्ये सांगीतिक गणिताची माहिती मिळणार आहे. गणिताची आवड असलेले जिनियस तसेच संगीताचे साधक यात सहभागी होऊ शकतात. तीन दिवसांच्या ऑनलाईन लर्निंग मॉडरेटर म्हणून माजी शिक्षण विभाग अधिकारी प्राची साठे काम पाहणार आहेत. दिनांक ११, १२, १३ सप्टेंबर २०२० रोजी हे वेबिनार आयोजित करण्यात आले असून यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा वेबिनार मोफत असून त्याचा लाभ घेण्यासाठी खालील वेबसाईटवर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.