सांकेतिक चित्रलिपी!
अनेक भाषांची मूळ लिपी चित्रांनीच तयार होते. वारली जमातीच्या निसर्गपुत्रांचा कलाविष्कार म्हणजे सांकेतिक चित्रलिपी आहे. या जमातीच्या जीवनाचे चित्रकला हे अविभाज्य अंग ठरते. काही संकेतांवर आधारित असणारी ही वारली चित्रशैली अत्यंत बोलकी व रसरशीत आहेत. निरागस आदिम संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात पडते. काहीशा गूढ संकेतांचे अर्थ समजून घेणे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही.
चित्रकला ही जागतिक भाषा मानली जाते. एखादी भाषा समजत नसेल तर चित्रांच्या माध्यमातून सहजपणे संवाद साधता येतो. चित्रकला या भाषेची लिपी साध्यासोप्या रेखाटनातून आकाराला येते. लहानपणी मातृभाषा कोणतीही असली तरी मूळाक्षरांंची ओळख चित्रांमधूनच होते. अ अननसाचा असुदे किंवा बी फॉर बॅट ! चित्र दाखवून मुळाक्षरे शिकवली जातात.पुढे चित्र मागे पडून आपण शब्दांमध्ये अधिक गुरफटत जातो. चित्रकला हे अव्यक्त भावभावना प्रभावीपणे व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहे. रंगरेषेद्वारे मनातील विचार मांडता येतात. आदिमानवापासून चित्रकला अवगत असल्याचे गुहाचित्रांवरून समजते. गुहेतील भिंतीवर आदिमानवाने शिकारीची दृश्ये रेखाटली आहेत. त्यातून त्याने आपली भूक व्यक्त केलेली दिसते. प्रागैतिहासिक काळापासून चित्रकला अस्तित्वात असल्याचे पुरावे गुहाचित्रांत आढळतात. भारतातील मध्यप्रदेशात भीमबेटका, फ्रान्समधील लास्को व स्पेनमधील अल्टामीरा येथील अतिप्राचीन गुहांमध्ये मानवाचा पहिला कलात्मक आविष्कार दिसतो. विशेष म्हणजे हजारो मैलांवरील या चित्रांमध्ये कमालीचे साम्य, सांकेतिक खुणा बघायला मिळतात. वारली चित्रकलेतही त्याचा प्रत्यय येतो.
अत्यंत अबोल, भाबडे असणारे आदिवासी वारली बांधव त्यांच्या चित्रांमधून सहजपणे संवाद साधतात. त्यांना जे म्हणायचे असते ते चित्रातून सांगतात. कथानक व दृष्यमानता हे वारली चित्रशैलीचे वैशिष्ट्य आहे. एका प्रकारे वारली चित्रशैलीमध्ये आत्मकथन केलेले आढळते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना आलेल्या अडचणींशी सामना करतकरतच त्यांची चित्रनिर्मिती सुरु असते. ही समृद्ध कलाच त्यांना समस्यांवर मात करण्याचे, आनंदाने जगण्याचे बळ देते.त्यांचे दुःख, दारिद्र्य, व्यथा, वेदना हे सारे पांढऱ्याशुभ्र लपून चित्रात मात्र आनंद, समाधान प्रकटते. त्यातून त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट होतो. म्हणूनच वारली चित्रे व्यथेची गाथा न बनता आनंदाची मुक्तपणे पखरण करतात. वारली चित्रशैलीत चुकूनही नकारात्मक प्रसंग, युद्ध, मारामाऱ्या यांचे चित्रण केले जात नाही. त्यामुळेच अलीकडे अनेक वास्तूतज्ज्ञ घरातील भिंतीवर आवर्जून वारली चित्रे लावण्याचा सल्ला देतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वारली चित्रलिपी रसिकांच्या काळजाला भिडते. कलाकाराच्या विचारांची स्पष्टता त्यात लख्खपणे दिसते. वारली कलाकार चित्र रंगवतो असे न म्हणता चित्र लिहितो असेच म्हणतो यातच चित्रभाषेविषयीची आपुलकी स्पष्ट होते.
आदिवासी वारली जमातीला त्यांच्या या चित्रभाषेने आत्मबळ दिले. त्यांना अस्तित्व, स्वत्व व नवचैतन्य मिळाले. आत्मसन्मान लाभला. वारली कलेच्या लोकप्रियतेमुळे या जमातीची प्रतिष्ठा वाढली. या साऱ्याचे श्रेय अर्थातच पद्मश्री जिव्या सोमा मशे या वारली कलेच्या आद्य प्रणेत्याला द्यायला हवे. वारली जमातीचे विश्व वेगळेच आहे. सांकेतिक पद्धतीने ते देहभान हरपून चित्रे रंगवतात. त्यात त्यांचे रीतिरिवाज, चालीरीती, सण -उत्सव, दैनंदिन जीवनातील प्रसंग कुडाच्या भिंतीवर आकाराला येतात.चित्रकल्पना, चित्रप्रसंग व सभोवतालची नक्षी यांची प्रेरणा त्यांना निसर्गातूनच मिळते.पारंपरिक वारली चित्रांना धार्मिक अधिष्ठान आहे. समाजमान्य संकेतांनुसार चित्रे उमटतात. वारली कलाकार स्वतःला चित्रकार मानतच नाहीत.ईश्वरी शक्तीने आपल्याकडून चित्र घडवून आणले अशी त्यांची श्रद्धा असते. चित्रातील प्रत्येक आकृतीत मग ती माणसांची असो वा पशुपक्ष्यांची त्यात जीव आहे अशीच त्यांची कल्पना असते. म्हणूनच वारली कलेतील गहन संकेत जाणकारांकडून समजून घेणे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही.
संकेत हा कलेचा
वारली चित्रशैलीतील काही रुढ संकेतांचे अर्थ जुनेजाणते सांगतात. मात्र गूढ संकेतांविषयी माहिती मिळत नाही. पुन्हा सर्व संकेतांचे अर्थ सर्वत्र सारखेच नसतात. देवतांच्या पुजेप्रसंगी चित्रात काढलेला सर्पाकार हा कुळाचार मानला जातो. तोच सर्पाकार तारपा नृत्यचित्रणात वेगळ्या स्वरुपात आकाराला येतो. झाडाच्या फांदीला विणलेले कोळ्याचे जाळे शोषणाचे प्रतिक ठरते. सवकारीपाश किंवा समाजातील वेगवेगळ्या स्तरातून होणारे शोषण जाळ्यात गुरफटलेल्या कोळ्याच्या चित्रातून दाखवले जाते. चित्रात वरच्या बाजूला असलेला वर्तुळाकार सूर्यदेवाची सांकेतिक खूण आहे. धार्मिक प्रसंगी चौकोनात रेखाटलेले वर्तुळ धरतीमातेचे संरक्षण सुचवते. चित्रातील चंद्र व सूर्य काळ दर्शवितात. वर्तुळाकारातील वर्तुळ दुष्ट शक्तींना दूर ठेवणाऱ्या देवतेचे मंदिर असते. वारली चित्रकलेत प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचाच वापर होतो. त्यासाठी गेरूने सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पीठाने चित्रे रंगवली जातात. क्वचितच लाल, पिवळा, निळा, काळा असे रंग सांकेतिक पद्धतीने वापरले जातात.