नाशिक : सह्याद्री फार्म्स आयोजित सह्याद्री संवाद उपक्रमांतर्गत येत्या रविवारी (दि. १७) रोजी दुपारी १२.३० वाजता ‘साखर उद्योगाचे भवितव्य’ या विषयावर साखर उद्योगाचे अभ्यासक आणि साखर सहसंचालक, (साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे) डॉ. संजयकुमार भोसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर साखर उद्योगात आता प्रचंड बदल झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि शासन यांच्यात कायम असमाधानाचे वातावरण राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी, कारखानदार आणि अन्य घटकांना अतिशय जागरूक राहून पुढची पावले टाकावे लागणार आहेत. भारतातील साखर कारखानदारी विशेषतः महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने, आंतरराष्ट्रीय स्तरावर साखर उत्पादन आणि साखरेचे भाव, उपपदार्थ निर्मिती त्यावरील प्रक्रियेतू मिळणारे उत्पन्न, इथेनॉलविषयी धोरण आदी साखर उद्योगाच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर डॉ. भोसले विवेचन करणार आहेत. हे व्याख्यान सह्याद्री फार्म्सच्या फेसबुक पेजवर लाइव्ह केले जाणार असून ते सर्वांसाठी खुले आहे. खालील लिंकवर हे व्याख्यान ऐकता येईल.https://www.facebook.com/SahyadriFarms/
व्याख्याते डॉ. संजयकुमार भोसले स्वतः ऊस उत्पादक व साखर उद्योगाचे अभ्यासक आहेत. साखर कारखान्यांसाठी काम करताना इथेनॉल ब्लेंडींग प्रोग्रामसाठी राष्ट्रीय पातळीवरील समितीत त्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. साखर कारखानदारी व साखर उद्योगाशी संबंधित अर्थकारणाचा विशेषतः बँकींगशी त्यांचा विशेष संबंध आहे. देशातील अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक आणि सहनिबंधक म्हणून काम पहाताना साखर कारखानदारीचे अर्थकारण त्यांनी अनुभवले आहे. पुण्यातील रूपी आणि श्री सुवर्ण सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आहे. महिला बचत गटांची निर्मिती, किसान क्रेडिट कार्ड आणि अल्टरनेट बँकींग याची यशस्वी अमंलबजावणी त्यांनी पीडीसीसी बँकेत केली. संयुक्त राष्ट्र डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मायक्रो फायनान्स आणि मायक्रो इन्शुरन्ससाठी गेली १२ वर्षे ते वित्तीय सुधारणाविषयक कामकाज पहात आहेत. शतकोत्तर सहकार, सहकार पर्व, को-ऑपरेशन बियाँड बँकींग हे ग्रंथ त्यांनी संपादित केले आहेत.