सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ काळे यांनी केली चौकशीची मागणी
इगतपुरी – तालुक्यातील सहाय्यक निबंधक (सहकार) कार्यालयातील सहकार अधिकारी अनिल रामसिंग पाटील यांनी शासनाची फसवणूक केली असून त्यांच्या सखोल चौकशीची मागणी पिंपळगाव मोर येथे सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ काळे यांनी केली आहे.काळे यांनी पाटील यांच्या उपस्थिती,गैरवर्तणुक,शासनाच्या फसवणुकीबाबत विभागीय सहनिबंधक नाशिक,सहकार आयुक्त पुणे,यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर असे की इगतपुरी सहाय्यक निबंधक कार्यालयात कार्यरत असलेले अनिल पाटील हें २०१४ पासून कार्यरत असून त्यांचे मुख्यालय हे इगतपुरी आहे.शासन निर्णयानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असतांना पाटील हे प्लॉट नं.६३,साक्षी ड्युप्लेक्स बंगलो,कल्पतरूनगर लेन नं.१,अशोकामार्ग नाशिक येथे राहत असून २०१४ पासून त्यांनी शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता व आदिवासी भागातील सेवेचा भत्ता ते आजपावेतो घेत आहेत.शासनाची फसवणूक करून त्यांनी २०१४ पासून लाभ घेतलेला घरभाडे भत्ता व आदिवासी भागातील घरभाडे भत्ता आदी रक्कम तात्काळ वसूल करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करण्यात यावी असे निवेदन सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधक यांना दिले आहे.
शासन निर्णयानुसार कार्यालयात ९.४५ ते ६.१५ या वेळेत कार्यालयात उपस्थित असणे बंधनकारक असताना पाटील हे मुख्यालयी राहत नसल्याकारणाने आठवड्यातुन एक-दोन दिवस येऊन संपुर्ण आठवड्याच्या सह्या हजेरी मस्टरवर करतात किंवा टूर लिहून शासनाची फसवणूक करत आहेत असे काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कार्यालयात येणाऱ्या अभ्यगतांना उद्धट वागणूक देऊन अपमानित करत असतात तसेच शासकीय नियमानुसार कोणतेही कागदपत्रांची मागणी केली असता शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत कलम ३५३ अंतर्गत केसच्या धमक्या देतात.सहकार अधिकारी अनिल पाटील यांच्या वर्तणूक,गैरहजेरी तसेच टूर लिहिण्याच्या दिवसांची सखोल चौकशी करून करण्याची मागणी निवेदनात चेअरमन पंढरीनाथ काळे यांनी यांनी केली आहे. अनिल पाटील यांनी सदर अर्जावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून लेखी तक्रार प्राप्त झाल्यास लेखी उत्तर देईल असे सांगितले.
खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला
‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य असलेल्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे वर्तन हे अत्यंत असभ्य आहे.उपस्थिती बाबतचा प्रश्न पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना कायमच आहे. मागील वेळेस भ्रष्टाचाराची चौकशी लावली असता त्याचा राग मनात धरून माझ्यावर ३५३ अंतर्गत खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला.शासनाकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करण्यात यावी.
– पंढरीनाथ काळे,चेअरमन,पिंपळगाव मोर सोसायटी
….
कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही
सदर तक्रारींवर मला लेखी अर्ज प्राप्त झाल्याखेरीज कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. लेखी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित विषयावर लेखी उत्तर देईल.
-अनिल पाटील, सहकार अधिकारी, इगतपुरी