पुणे – राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक आराखडा-२०२० जिल्हानिहाय जाहीर करण्यात आला आहे. तशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.
शासनाच्यावतीने कोविड -१९ ही जागतिक महामारी घोषीत करण्यात आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर १८ मार्च २०२० पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. तसेच निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने २ फेब्रुवारी रोजी आदेश दिलेले आहेत. या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याकरिता प्राधिकरणाने पूर्वतयारी केलेली असून एकूण चार टप्प्यामध्ये या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. पाटील म्हणाले, प्राधीकरण गठीत झाल्यापासून ३१ डिसेंबर २०२० अखेर अ, ब, क, ड या वर्गीकरणाच्या एकूण निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या ४४ हजार ६१३ इतकी आहे. टप्पा क्रमांक १ मध्ये यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या परंतु कोविडमुळे प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या 3 हजार २१३ सहकारी संस्थाचा समावेश आहे.
या टप्प्यातील निवडणुका १५ फेब्रुवारी २०२१ पासून निवडणूक प्रकिया सुरु करुन सामान्यपणे विहीत मुदतीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक २ मध्ये १२ हजार ५०८ सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या टप्प्यातील निवडणुका ३० एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक ३ मध्ये एकूण १४ हजार ३०१ सहकारी संस्थाचा समावेश असून या टप्प्यातील निवडणुका ३१ मे २०२१ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत.
टप्पा क्रमांक ४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२० अखेरच्या एकुण १४ हजार ५९१ सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार असुन या टप्प्यातील निवडणुका ३० जून २०२१ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक २ ते ४ बाबत निवडणूकीस पात्र असणा-या सहकारी संस्थांच्या मतदारांची प्रारूप मतदारयादी तयार करण्याकरीता अर्हता दिनांक हा टप्पानिहाय प्राधीकरणाकडून स्वतंत्र आदेशाने जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्हा निवडणूक आराखडा-२०२० मधील नमूद निवडणूक पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच सन २०२१ च्या ई -१ प्रमाणे पात्र एकूण १९ हजार ७१६ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधीकरण स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे. निवडणुका या टप्पानिहाय विहीत कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्याबाबत प्राधीकरणाकडून नियोजन व पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी म्हटले.