नाशिक – राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सलग चाैथी मुदतवाढ राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील, संचालक मंडळाची मुदत संपलेल्या व निवडणूकीस पात्र असलेल्या जवळपास २३०० सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. या मुदवाढीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, कादवा सहकारी साखर कारखाना यांच्यासह सर्व बाजार समित्या आणि विकास कार्यकारी सेवा संस्थांचा समावेश असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे.
एकीकडे कोरोना काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतांना सहकारी संस्थाना दिलेली ही चौथी मुदवाढ टीकेचा विषय ठरली आहे. या अगोदर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २७ व ३१ जानेवारी २०२० राेजी पहिली मुदतवाढ दिली हाेती. त्यानंतर सलग दाेन वेळा तीन तीन महिन्यांची मुदतवाढ देणारे आदेश काढले हाेते. तिसऱ्या मुदतवाढीची मुदत ३१ डिसेंबर २०२० राेजी संपली हाेती. आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.