नाशिक : राज्यात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मीत बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले आहे. नाशिकच्या भरारी पथक क्रमांक एकच्या पथकाने गुजरात राज्यातील दोघांना बेड्या ठोकत स्कार्पिंओसह सव्वा बारा लाखाची दारू हस्तगत केली आहे. ही कारवाई हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात करण्यात आली.
मिनेशभाई कांतीलाल पटेल (३० रा.कुरगावमदन ता.धरमपुर) व जयेशभाई अरविंदभाई हडपती (३४ रा.सलवानगाव ता.वापी जि.बलसाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ,अधिक्षक डॉ.मनोहर अंचुळे आमि उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळापासून बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. निरीक्षक मधुकर राख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुत्रावे यांना मिळालेल्या माहिती नुसार बुधवारी मध्यरात्री पथकाने हरसूल पेठ मार्गावर सापळा लावला असता ही कारवाई करण्यात आली. भरधाव येणाºया जीजे ०१ केएम ९३८७ या स्कार्पिओचा भरारी पथक क्र.१ ने पाठलाग करीत दोघांना बेड्या संशयीतांना ठोकल्या. यावेळी वाहनाची तपासणी केली असता स्कार्पिओ मध्ये बनवलेल्या चोर कप्यात राज्यात बंदी असलेला आणि दादर नगर हवेली निर्मीत रॉयल स्टॅग,इम्प्रीयल ब्ल्यू,जॉन मार्टीन व्हिस्कीसह कासबर्ग, ट्युबर्ग,किंगफिशर बिअर आदींची खोकी मिळून आली. पथकाने दोघांना अटक करून वाहनासह १२ लाख १३ हजार ०४० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई दुय्यम निरीक्षक राम सुपेकर जवान विलास कुवर,सुनिल पाटील,धनराज पवार अनिता भांड आदींच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सुत्रावे करीत आहेत.