नाशिक – कोरोनाच्या महामारीचे जागतिक संकट सुरु असताना जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्रातर्गत कार्यरत आशा कार्यकर्ती मालू अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी हातात वँक्सिन कॅरियर घेऊन पाण्याने भरलेल्या नदीतून वाट काढत आपले कर्तव्य बजावले. कर्तव्याला प्रथम प्राधान्य देवून काम करणा-या आशाताईंच्या कामामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी समाधान व्यक्त करुन त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे.
गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत.. आज कोविड महामारीच्या काळात आपले सर्वस्व पणाला लावून या आशा व अंगणवाडी सेविका कोविड योद्धा म्हणून आपले समाजसेवेचे व्रत अगदी चोखपणे बजावत आहेत. कोरानाची साथ सर्व ठिकाणी चालू असताना नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. केवळ कोविड १९ चे काम न करता नियमित लसीकरण , प्रसूती आणि प्रसूतीपश्चात सेवा अविरतपणे देत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर व ग्रामीण भागामध्ये अर्धवार्षिक पल्स पोलिओ मोहिम २० सप्टेंबर रोजी राबविण्यात आली जी बालके लस घेण्यासाठी बुथवर येऊ शकली नाही त्यांना घरी जाऊन पोलिओ लस देण्याचे काम आरोग्य कर्मचारी, आशा करीत आहेत. मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशाताई मालू अहिरे यांनी नदीमध्ये तुडूंब पाणी असताना आवश्यक आरोग्यविषयक साहित्य घेवून बालकांना पोलिओचा डोस देण्याचे काम केले आहे. त्यामुळे अहिरे यांचे विशेष कौतुक होत आहे.
आता सर्वेक्षणातही सहभाग
जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरु असून प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातही आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व शिक्षक महत्वाचे योगदान देत आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक गावात अगदी खेड्या-पाड्यात प्रत्येक घरासमोर जाऊन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरु आहे. कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. आपले नियमित काम सांभाळून हे कर्मचारी कोरानाचेही काम करीत आहेत. आज बाहेर फिरणं धोक्याचं असताना तो जीवावरचा धोका पत्करून या भगिनी समाजासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहेत. या सर्वांचे काम प्रेरणादायी असून बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातून वाट काढून कर्तव्य बजावणा-या मालेगाव तालुक्यातील आशाताईंचा जिल्हा परिषदेला अभिमान आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी म्हटले आहे.