मुंबई – बॉलीवूडमधील सुंदर, सालस आणि गुणी अभिनेत्री भाग्यश्री हिचा २३ फेब्रुवारी हा जन्मदिवस. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तरीही तिची ओळख सलमान खानची अभिनेत्री हीच तिची ओळख बनली. तिचा चित्रपटसृष्टीतील पदार्पणाचा चित्रपट ‘मैंने प्यार किया’ हा सलमान खानसोबतच होता. १९८९ मध्ये आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. आजही हा चित्रपट आवडीने बघणारे अनेकजण आहेत.
‘मैने प्यार किया’मधील ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. मुळात सलमान आणि भाग्यश्री हे दोघे चांगले मित्र असल्याने त्यांचे आपापसातील बाँडिंगही चांगले आहे. या जोडीची चर्चा देखील झाली. या दोघांशी संबंधित अनेक किस्से आहेत. एकदा एका फोटोशूट दरम्यान फोटोग्राफरने सलमान खानला भाग्यश्रीला किस कर असे सांगितले. पण सलमानने त्याला नकार दिला. ही गोष्ट भाग्यश्रीला कळल्यावर तिच्या नजरेत सलमान खानसाठीचा आदर अधिकच वाढला.
डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्याा एका मुलाखतीदरम्यान भाग्यश्रीने हा प्रसंग सर्वांना सांगितला. भाग्यश्री सांगते की, त्यावेळी आम्ही नवीन होतो. आणि ते फोटोग्राफर खूप प्रसिद्ध. त्यामुळे आपण जे सांगू ते त्यांच्याकडून केले जाईल, असे त्यांना वाटले असावे. खरेतर सलमान आणि त्यांचे बोलणे मी ऐकले होते. पण, सलमानने अशी पोझ देण्यास नकार देतानाच, जर तुम्हाला असा कोणताही फोटो हवा असेल, तर त्यासाठी आधी भाग्यश्रीची परवानगी घ्यायला हवी, असेही त्यांना सांगितले. तेव्हा मला आपण योग्य लोकांसोबत असल्याची खात्री पटली.
लोकप्रिय अभिनेत्री असूनही भाग्यश्रीने चित्रपटांपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. याचा तिला त्रास झाला नाही का, असे विचारल्यावर ती म्हणते, मी त्यावेळी लोकप्रिय असल्याने, भरपूर काम मिळत असल्याने माझ्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नव्हते.
कारण, मी अजून चांगले करू शकते, याची मला खात्री होती. पण त्याचवेळी माझ्या खाजगी आयुष्यात मी काम थांबवणे, ही सर्वात पहिली गरज होती. कारण, मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा होता. शिवाय मी प्रेग्नंट असल्याने मला तो सगळा काळ एन्जॉय करून, बाळंतपणानंतर माझ्या बाळालाही वेळ द्यायचा होता. यासाठी मी तो निर्णय घेतला होता.