जयपूर – राजस्थानमध्ये अभिनेता सलमान खान याच्या नावावर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सलमान खान याचा घोडा विकण्याची बतावणी करून एका महिलेकडून १२ लाख रुपये लाटल्याची तक्रार महिलेनं केली आहे.
संशयितांनी आपण व्यापारी आहोत, असं महिलेला सांगून योग्य किमतीत सलमान खान याचा घोडा उपलब्ध करून देऊ शकतो अशी बतावणी केली. घासाघीस केल्यानंतर महिलेने घोडा घेण्यासाठी ११ लाख रुपये रोख आणि बाकी पैसे धनादेशाद्वारे दिले. परंतु तिला घोडा मिळालाच नाही.
महिलेने घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हे प्रकरण पोलिस उपायुक्तांकडे घेऊन जाऊन कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देत राजस्थान उच्च न्यायालयानं महिलेची याचिका फेटाळली.
याप्रकरणी निर्भय सिंह, राजप्रीत तसेच अन्य एका व्यक्तीने संतोष भाटी यांना सलमान खान एका घोड्याजवळ उभा असलेला फोटो दाखवला आणि फसवणूक केली असं महिलेचे वकील पी. डी. दवे यांनी सांगितलं.