नवी दिल्ली – देशातील सर्व चित्रपटगृहे उद्यापासून (१ फेब्रुवारी) १०० टक्के आसन क्षमतेने चालवायला परवानगी देण्यात आली आहे. तशी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. चित्रपटगृह चालकांनी शक्यतो ऑनलाइन तिकीट विक्रीवर भर द्यावा. त्याचप्रमाणे चित्रपटांच्या दोन खेळांमध्ये पुरेसा अवधी ठेवावा. स्वच्छता आणि आरोग्यासंबंधींच्या नियमांचे योग्यरीतीने पालन करावे, असही सांगण्यात आल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स आणि प्रेक्षागृहांसाठी सर्वसाधारण नियमावली तयार करण्यात आली आहे. तरीही राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेऊन या व्यतिरिक्त उपाययोजनांचा विचार करता येईल, असेही जावडेकर यांनी नमूद केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मात्र ही परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनामुळे सर्व चित्रपटगृहे बंद होती.
दरम्यान, परवानगी मिळाली असली तरी नवीन चित्रपट प्रदर्शित झाले नसल्याने प्रेक्षक कसे येणार असा प्रश्न चित्रपटगृह चालकांना पडला आहे. त्यामुळे नवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षक चित्रपट गृहात येणार असल्याचे चित्र आहे.