नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. प्रारंभी माजी राष्ट्रपती भारत रत्न प्रणव मुखर्जी, एक विद्यमान लोकसभा सदस्य तसंच १३ माजी सदस्यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एक तासासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या या अधिवेशनात सदस्यांनी मास्क परीधान करून तसंच एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत कामकाजात भाग घेतला. त्यांनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन लाख ३५ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत सादर केल्या. यामध्ये प्रामुख्याने एक लाख ६६ हजार कोटी रूपये हे सध्याच्या कोविड- १९च्या साथ नियंत्रणाच्या खर्चासाठी प्रस्तावित आहेत.
४० हजार कोटी रूपये हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वाढलेला खर्च भागवण्यासाठी, वीस हजार कोटी रूपये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना भांडवल म्हणून देण्यासाठी आणि प्रधान मंत्री जनधन योजना आणि राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ३३ हजार ७७१ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा कण्यात आला आहे.
राज्यांनाही १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महसूलातील तुटीपोटी अतिरिक्त वाटप करण्यासाठी ४६ हजार कोटी ६०२ लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोना विषाणू संसर्गाची साथ आटोक्यात आणण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांसाठीही मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करण्यात आली आहे. पुरवणी मागण्यांचा हा पहिला टप्पा आहे.
दुपारी राज्यसभेचं कामकाजही माजी राष्ट्रपती मुखर्जी तसंच तीन विद्यमान दिवंगत सदस्यांनी श्रद्धांजली वाहून सुरू झालं. एक तासाच्या कामकाज स्थगितीनंतर १५ नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये परभणीच्या फौजिया खान यांचा समावेश आहे.