नाशिक – राज्य सरकारने ३ टक्के मुद्रांक शुल्काची सवलत दिली असल्याने तिचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक मुद्रांक व नोंदणी कार्यालयात येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर आणि स्कॅनिंग डाऊनचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे अनेक तास थांबण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने ५ टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांची सवलत दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही त्यास मोठा प्रतिसाद दिला आहे. परिणामी रिअल इस्टेट क्षेत्रात जणू तेजी आल्याचे वातावरण आहे. सहाजिकच मुद्रांक व नोंदणी कार्यालयात येणाऱ्यांची संखअया प्रचंड वाढली आहे. तसेच, नागरिकांना या सवलतीचा लाभ मिळावा म्हणून या महिन्यात दर शनिवारीही कार्यालय सुरू ठेवले जात आहे. असे असले तरी स्कॅनिंग आणि सर्व्हर डाऊनचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तासनतास कामे खोळंबत आहेत. तसेच नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे. राज्य पातळीवरील सर्व्हर मुळेच यंत्रणा संथ होत असल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना स्थानिक कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना करावा लागत आहे. याची दखल घेऊन तत्काळ त्रुटी दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
—
दस्त नोंदणी होत नसल्याने मोठा वेळ कार्यालयात घालवावा लागत आहे. सरकारला नक्की सवलत द्यायची आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- राहूल सोनार, नागरिक
स्कॅनिंगची अडचण आहे. ते सध्या बंद आहे. येत्या २ दिवसात यंत्रणा सुरळीत होणे अपेक्षित आहे. त्यासाठी योग्य तो पाठपुरावावरील कार्यालयाशी सतत सुरू आहे. शिवाय दर शनिवारीही कामकाज सुरू आहे. आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दररोजच्या कामाची वेळ दोन तास वाढवून दिली आहे. त्याची अंमलबजावणी सर्व कार्यालयात होत आहे.
- कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक