नवी दिल्ली – शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीतून भूपेंदरसिंह मान यांनी माघार घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यीय समितीची घोषणा केली. त्यात कृषी तज्ज्ञ अशोक गुलाटी, प्रमोद जोशी, अनिल धनवट आणि भूपिंदरसिंह मान यांचा समावेश होता.
मान यांच्या निवडीनंतर शेतकरी आंदोलक आणि संघटनांमध्ये वाद निर्माण झाला. त्याची दखल घेतच मान यांनी या समितीतून माघार घेतली आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या निवडीबद्दल मी न्यायालयाचा आभारी आहे. मी नेहमीच शेतकरी आणि पंजाबच्या पाठिशी आहे. शेतकरी आणि पंजाब यांच्या हिताशी तडजोड करु शकत नसल्यानेच मी समितीतून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मान यांच्या माघारीमुळे आता समिती त्रिसदस्यीयच राहिली आहे. या समितीला आता न्यायालयाला अहवाल सादर करायचा आहे.