नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने ऐतिसाहिसक निर्णय देऊन सर्व लेकींना मोठा सुखद धक्का दिला आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीचाही समान वाटा मिळेल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
वडिलांच्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना समान वाटा मिळेल, असे २००५ मध्ये अधिनियमित करण्यात आले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र, हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा ऐतिहासिक निर्णय न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला आहे.
वडिल हयात असो किंवा नसो, संपत्तीचे वाटप करताना मुलाला व मुलीला समान वाटा मिळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ‘प्रत्येक मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीच असते’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.