वाराणसी – भारतवासियांना सध्या एकाच प्रश्नाने छळले आहे. ते म्हणजे पेट्रोल व डिझेलचे दर नक्की कधी कमी होणार. शंभरीच्या आसपास गेलेल्या इंधन दराने देशवासियांना मोठ्याच चिंतेत टाकले आहे. तसेच, इंधन दराच्या या उसळीमुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची चिन्हे आहेत. अखेर यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे.
प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानं ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे. हिवाळा संपताच तेलाच्या किमतीही घटतील. हे आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे. मागणी वाढल्यानं किमती वाढत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रधान म्हणाले की, ईशान्येकडी राज्ये ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम यांचा समावेश आहे. ही राज्ये देशाच्या तेल आणि गॅससाठी महत्त्वाचे आहेत.
देशातील पहिले तेलाच्या साठ्याचा शोध आसाममधील डिगबोई आणि दुलियाजान क्षेत्रांजवळ लागला होता. देशात जवळपास १८ टक्के तेल संशोधन ईशान्येकडील राज्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा या राज्यात होत आहे. या परिसरातील अनेक क्षेत्र तेल आणि गॅसनं परिपूर्ण आहेत.
२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर सरकारनं कच्चे पाइपलाइन, गॅस पाइपलाइनची पायाभूत रचना बनवून संशोधन, शोध आणि गॅस उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता.