सर्वसामान्यांचे जीवन प्रकाशमान करणारे दादाजी
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादा यांची १९ ऑक्टोबर ही १०० वी जयंती. हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा होता. त्यानिमित्ताने केलेले हे चिंतन…
विश्वात सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती जगाचं ज्योतिर्लिंग असलेली पवित्र भारतमाता पण भारतवासी असे निराश गोंधळलेले तेजहीन असंस्कारी का? असा प्रश्न दादांना सतावत होता. 1954 मध्ये जपानमध्ये झालेल्या विश्व तत्त्वज्ञान परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दादांनी जगातल्या तत्वचिंतकांसमोर भारतीय संस्कृती व भगवान योगेश्वर श्रीकृष्णाचे विचार मांडले. अवतारवाद हा विषय स्पष्ट करतांना अर्थकारण, राजकारण, शिक्षण, समाजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म व वैश्विक जीवन अशा विविध क्षेत्रात श्रीकृष्णाचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे.
दादांच्या मुखातून स्रवलेल्या ज्ञान तीर्थाने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध व प्रभावित झाले. अमेरिकेतील ह्यूमन अप लिफ्टमेंट सोसायटीचे डॉ क्रॉम्प्टन यांनी तर दादांसमोर विविध प्रलोभनांचा प्रस्ताव ठेवून अमेरिकेत राहून विचार मांडण्याची कार्य करण्याची विनंती केली. पण दादांच्या समोर भारत माता व भारतीय माणूस हेच लक्ष होते. दादांनी नम्रपणे तो प्रस्ताव नाकारला. शास्त्रशुद्ध भक्तीने मानवातील चैतन्य जागृत करण्यासाठी, माणसाला गौरव प्राप्त करून देण्यासाठी आणि माणसातील अहंगंड, न्यूनगंड व भयगंड नष्ट करण्यासाठी दादांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वाध्याय भक्तीचा निर्घोष केला.
महाराष्ट्रातील रोहा जि. रायगड येथे १० ऑक्टोबर १९२० रोजी जन्मलेले दादा ही वैश्विक आवश्यकता होती. दादांची कुल परंपरा, बालपण, शिक्षण, जडणघडण या सर्व घटकांकडे बघितलं तर एक सर्वोच्च ध्येय प्रकाशमान होते. त्यांची ज्ञानसाधना, वाङ्मयीन तप, चिंतन, मनो मंथन या पार्श्वभूमीवर त्यांना जाणवले धर्म आंधळा, भक्ती पांगळी, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, तत्वज्ञानी अकर्मण्य, व्यक्ती जीवन, कुटुंब जीवन व समाज जीवन प्रदूषणग्रस्त या भीषण संकटातून जगाला वाचविण्यासाठी दादांनी स्वाध्याय मंत्र दिला.
आपल्या ऋषीमुनींनी सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती उभी करण्यासाठी जीवनाचा यज्ञ केला. पण आज माणसाला या संस्कृतीचा विसर पडल्यामुळे लाचारी, भेदाभेद, असंस्कृतपणा, अस्पृश्यता अशी अनंत संकटे वाढली माणूस दुसऱ्याला कमी लेखतो, हलका समजतो का ? प्रत्येक मानव हा भगवंताचं लेकरू, विश्वसंचालक शक्ती माणसात वास करते मग त्याला untouchable का ठरवलं जातय? या सर्व चिंतनातूनच दादांनी मुंबईच्या श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेतून स्वाध्याय गंगेचा शुभारंभ केला.
स्वाध्याय म्हणजे स्व चा अभ्यास. स्वतःच्या शरीरात असलेला स्व म्हणजे चैतन्य तत्व त्याला ओळखणे व दुसऱ्याच्या स्व बद्दल आदर बाळगून त्याचा अभ्यास करणे. विवेक, प्रकाश व जीवननिष्ठा म्हणजे स्वाध्याय. अयोग्य वर्तन व्यवहार वृत्ती व कृतीचा त्याग करणे म्हणजे स्वाध्याय. वाचन, मनन, चिंतन त्यातून स्वात्मज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजे स्वाध्याय. जगातील कोणतेही कार्य हे विचार, व्यक्ती व वित्तावर आधारीत असते. प्रभू दत्त विचार, प्रभू दत्त माणूस व प्रभू दत्त वित्त या पायावर दादांनी काम सुरू केले त्याचा आत्मा अयाचक व्रत, ज्ञान, कर्म व भक्तीचा त्रिवेणी संगम स्वाध्याय सर्वस्पर्शी व अखिलात्मानंदी बनवू लागला.
व्यक्ती, कुटुंब, समाज व विश्व सर्वत्र स्वाध्यायाचा मुक्त संचार करण्यासाठी दादांनी विविध भक्ति निष्ठ क्रांतिकारी प्रयोगांची परिणामकारक रचना व गुंफण केली. गीतामृताला केंद्रस्थानी ठेऊन घर मंदिर, वृक्ष मंदिर, माधववृन्द, याज्ञवल्क्य उपवन, योगेश्वर भाव कृषी, श्री दर्शनम, मत्स्यगंधा, अमृतालयम, पाण्यासाठी शोष खड्डे, विहीर पुनरभरण कुआ रिचार्ज, निर्मलनीर, पतंजली चिकित्सालय, आरोग्य संयूज या प्रयोगांनी स्वाध्याय चौफेर पाझरू लागला. भिनू लागला, मनामनात, अंतःकरणात, हृदयात घर करू लागला.
सर्व भेद व वादांना पार करून स्वाध्याय सर्वांतर्यामी स्थिरावला. आपला धर्म न सोडता भक्ती करता येते हे स्वाध्यायाने सिध्द केले. कारण येथे सर्वधर्म समन्वयस्वीकार आहे. अमृतालयममध्ये बांग देवून नमाज पढू शकतात, येशूची प्रार्थना करू शकतात, बहारीनमध्ये मशिदीत मुस्लीम बांधव त्रिकाल संध्येचे पठण करतात. विदेशात योग अली सारखा प्रयोग हे सर्वोत्तम उदाहरण. प्रत्येकाच्या शरीरात लाल रक्त बनविणारा, रक्ताचे शक्तीत रुपांतर करणारा एक, सर्वांसाठी चंद्र सूर्य आकाश पृथ्वी व हवा एक संपूर्ण विश्वासाठी एकात्म आहे. ही मानसिकता, विचारधारा, उपासना प्रणाली विश्वमान्य झाली.
दादांचे भक्तिनिष्ठ क्रांतिकारी प्रयोग कार्यान्वित करणारी यंत्रणा, मनुष्यबळ ठाणे येथील तत्वज्ञान विद्यापीठाच्या सूत्रसंचालनानुसार कृतिशील झाले. स्वाध्यायामुळे माणूस स्वयंप्रकाशी व आत्मनिर्भर बनू लागला. मंदिर, एकादशी, तीर्थयात्रा, यज्ञ, उपवास, सण उत्सव, पूजेची भक्तीची साधने यात दडलेला जीवनबोध जीवन विकासाची उर्जा, ज्ञान प्रकाश दादांनी सर्वांसाठी सुलभ व मुक्त केला. गीतेच्या तालावर, त्रिकाल संध्येच्या प्रकाशात, स्वाध्याय रंगात निस्वार्थ वृत्तीने, कृतज्ञता युक्त अंतःकरणाने व समर्पित भावाने सदैव कृतिशील असणारा वैश्विक स्वाध्याय परिवार दादांनी निर्माण केला.
Divine brotherhood under the fatherhood of God याद्वारे विश्व कुटुंब स्थापन झाले.
मन, बुध्दी, चित्त, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये व देहमंदिरात स्थिर झालेल्या, ठाण मांडून बसलेल्या अज्ञान, अंधश्रध्दा, अनिष्ठ व आत्मघातकी रुढी परंपरा, भ्रामक समजुती, चुकीच्या मान्यता, स्वाध्याय प्रकाश व उर्जेने हळूहळू हद्दपार केल्या. त्यामुळे माणसाची समज शुद्ध झाली.
मनाचे शुध्दीकरण करणारी प्रातः प्रार्थना, सायं प्रार्थना यामुळे मनावर विवेक रूपी पहारेकरी निर्माण झाला. परिणाम स्वरूप व्यक्ती कुटुंब व समाज जीवनातील प्रदूषण कमी कमी होऊ लागले.
Mere material progress alone destroy human life, हा सार्वत्रिक ज्वलंत अनुभव आहे. सत्ता लालसा, भोगालालसा व संग्रह लालसा यांनी विवेकहीन हावरट व राक्षस बनलेल्या मानवाला आतुन बाहेरुन शुध्द, पवित्र, सामर्थ्यवान व विवेक संपन्न बनविणारी स्वाध्याय विचारप्रणाली, उपासना प्रणाली व जीवन प्रणाली विलक्षण परिणामकारक व प्रेरणादायी ठरली
मानवी जीवनाचा उद्देश आत्मज्ञान हाच आहे. मानव जोपर्यंत चराचर सृष्टीशी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत आत्मज्ञान असंभव. सर्वांतर्यामी वास करणारा सगुण निर्गुण ईश्वर एकच हा अनुभव घडविणारी स्वाध्याय जीवनशैली हा स्वाध्यायसूर्य पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी भूतलावरील मानवास दिलेला सर्वोच्च चिरंतन उपहार आहे.
धनसंपत्ती, सत्ता, विद्या, वैभव, कीर्ती, प्रतिष्ठा, पोझिशन व पझेशन असं काहीही नसलेला माणूस हीन, दीन, लाचार किंवा हलका नाही. कारण त्याच्या देह मंदिरात विश्वाची निर्मिती, संचालन व नियमन करणारी शक्ती चैतन्य रूपाने वास करते, ही ओळख दादांनी माणसाला दिली .
आत्मगौरव, परसन्मान व सृष्टीगौरव या त्रिपुटी द्वारे दादांनी मनुष्यत्व, मनुष्य जीवन प्रकाशमान केले. सर्वांना गौरव प्रदान करणाऱ्या स्वाध्याय युग निर्मात्या दार्शनिका बद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती वैश्विक स्वाध्याय परिवारातर्फे मनुष्य गौरव दिन म्हणून एकात्म पध्दतीने साजरी केली जाते .
(लेखकाशी संपर्क – 8007975760)