राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा लेख
…..
माननीय शरद पवार साहेब यांच्याविषयी जितके लिहावे, बोलावे तेवढे कमी आहे.राजकारणापासून ते क्रिडा विश्वापर्यंत आणि शेतीपासून ते डिजिटल जगापर्यत सर्वच क्षेत्रात त्यांचे ज्ञान वाखण्याजोगे आहे. आपल्या मधूर वाणीतून कार्यकर्ताच नव्हे तर सामान्यांना आपलंसं करून घेण्याची साहेबांची हातोटीआहे. शरद पवार साहेबांचे वय ८० वर्षे असले तरी त्यांच्यातील कामा प्रतीची आत्मियता, सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याची तळमळ आम्हा कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन जाते. वयाच्या या टप्यावरही पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहेबांचे काम अविरतपणे सुरू आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील कार्यकर्त्याला आमदारकीची संधी दिली खासदार की साठी उमेदवारी दिली तर आता थेट विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.त्यांचे बोट धरून राजकारणातून समाजकारण करण्याचे भाग्य मला लाभले यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजतो.
नाशिक आणि पवार साहेब हे गेल्या काही वर्षातील अतूट नाते बनले आहे. विशेष म्हणजे साहेबांचेही नाशिकवर तितकेच भरभरून प्रेम आहे. जिल्ह्यातील कांद्याचा प्रश्न असो की अतिवृष्टी, दुष्काळाने बाधित शेतकर्यांच्या समस्या जेव्हा-जेव्हा मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तेव्हा त्यांनी त्या अगदी नम्रपणे सोडविल्या. अन् आजही अशा निरनिराळ्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी त्यांचा मदतीचा हात तयार असतो. ५० वर्षाहून अधिक काळापासून देशाचे राजकारण जवळून पाहणारे अन् अनुभवणारे एकमेव नेते म्हणजे पवार साहेब आहेत. देशातील सध्याचे वातावरण धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरते आहे. परंतू, याकाळात पवार साहेबांचे राजकारण हे सर्वधर्म समभाव आणि सर्वसमावेशक असेच आहे. त्यामुळे युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तसेच महिलांमध्येही साहेबांबद्दल आदराचे स्थान आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत एकीकडे राज्यात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेले असताना नाशिक जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत पक्षाला सहा जागांवर विजयी केले. त्यात दिंडोरीतून सलग दुसर्यांदा विजय संपादन करण्यात मला यश लाभले. हे केवळ साहेबांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि त्यांच्या करिष्म्यामुळे साध्य झाले. एवढेच नव्हे तर दिंडोरी-पेठसारख्या आदिवासीबहुल तालूक्याचे प्रतिनिधित्व करताना साहेबांनी मला महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानसेभेचे उपाध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान दिला. एका आदिवासी व्यक्तीला एवढा मोठा बहुमान मिळणे हे केवळ शरद पवार साहेेबांच्या नेतृत्वातच शक्य आहे. पवार साहेबांची ज्या-ज्या वेळी भेट होते तेव्हा राजकारणाच्या बाळकडूसोबत इतर गोष्टी शिकण्यास मिळतात. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान घेणे, नवनविन गोष्टी आत्मसात करताना त्या जाणून घेण्याची साहेबांची मनीषा वाखाण्याजोगी आहे. त्यांच्या याच स्वभावाचा कळत-नकळत आमच्यावरही परिणाम झाला आहे.
मतदारसंघातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी त्याची मदत होते.दिंडोरीच्या माळरानावर द्राक्ष बागा फुलल्या यात साहेबांचा मोठा वाटा आहे साहेबांनी एन एच बी च्या योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिल्या. साहेबांबद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच. कारण सार्वजनिक आयुष्यात जगताना तुम्हाला अनेक बंधने पाळावी लागतात. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ समाजकारणात वावरताना साहेबांनी ग्रामपंचायत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षण व कृषीमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राजकारणासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद तसेच विविध
संघटनांवरही त्यांनी कार्य केले, किंबहुना आजही करीत आहेत. हे सर्व करताना एक तत्व साहेबांनी नेहमीच पाळले. ते म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची व मतदाराशी असलेली नाळ कधीही तुटू न देणे. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील साहेबांचा उत्साह आणि कामाप्रती झोकून देण्याची तळमळ पाहता एखाद्या तरूणाला लाजवेल असे त्यांचे कार्य आहे.
माणसांची पारख कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पवार साहेब. अवघ्या काही मिनिटांच्या संवादात समोरची व्यक्ती कशी आहे, हे ओळखण्याची कला त्यांना आत्मसात आहे. कोणत्या कार्यकर्त्यांकडून कोणत्या क्षणी काय काम
करून घ्यायचे हे साहेबांना अगदी लिलया जमते. एखादा कार्यकर्ता जर जिद्द व सचोटीने काम करीत असेल तर त्याच्या कामात कोठेही हस्तक्षेप करायचा नाही, हा साहेबांचा आणखीन एक चांगला गुण म्हणता येईल. त्यांच्या याच गुणांमुळे
कार्यकर्ते त्यांच्यावर जीव तर ओवाळतातच शिवाय पक्षाने दिलेली जबाबदारीही समर्थपणे पार पाडतात.
राज्यात गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूका आणि त्यानंतरच्या सत्तासंघर्षात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नुकतीच सरकारची वर्षपूर्ती झाली. सरकारसाठी हे वर्ष कठीण असेच होते. कोरोना या वैश्विक महामारीने राज्याला कवेत घेतले. परंतु, संकटाला संधी मानून पुढे जाण्याचा पवार साहेबांनी दिलेला सल्ला आम्हाला याकाळात कामी आला. वर्षभरापासून सरकारने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड-19 ला अटकाव करणे शक्य झाले. साहेबांच्या नेतृत्व गुणांमुळे हे प्रत्यक्षात घडू शकले. त्याचबरोबर साहेबांच्या मार्गदर्शनाने महाविकास आघाडीचे सरकार समर्थपणे राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहे, यात दुमत नाही. आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक व्यक्ती आपल्याशी जोडल्या जातात. यातील काही कायमच्या सोबती बनतात. तर काही आयुष्याचा धडा देतात. मात्र, त्यातही काही व्यक्तीमत्त्व असे असते की, त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला खरा अर्थ व आकार मिळतो. पवार साहेब हे माझ्या जीवनातील असेच एक मार्गदर्शक व्यक्तीमत्व आहे. मला आणि माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी
घडविले आहे. अशा या सर्वसमावेशक व सर्वव्यापी नेतृत्वाला त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कोटी-कोटी शुभेच्छा.
– नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य.