नाशिक – सराफ बाजाराच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असली तरी चोरट्यांचे धाडस वाढले असल्याची बाब समोर आली आहे. सोने-चांदी खरेदीसाठी आलेल्या दुचाकीस्वार सराफाच्या रोकडची पिशवी चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना सराफ बाजारातील मारूती मंदिर परिसरात घडली. या पिशवीत २० लाख रूपयांची रोकड होती. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान ही घटना पाळत ठेवून अथवा पाठलाग करून घडल्याचे बोलले जात असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मधुकर पवार (रा. मेरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार यांचे औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात सराफी पेढी असून गुरूवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते सोने चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात आले असता ही घटना घडली. पवार नेहमी प्रमाणे पैश्यांची पिशवी दुचाकीच्या पाठीमागील कॅरीला बाधून घेवून आले होते. मारूती मंदिर परिसरात ते मोटारसायकलवरून प्रवास करीत असतांना गर्दीतील पादचारी चोरट्यांनी रोकडवर डल्ला मारला. पवार यांना कळण्यापूर्वीच कॅरीला बांधलेली पिशवी चोरट्यांनी सोडून नेली. ही बाब लक्षात येताच पवार यांनी सरकारवाडा पोलीसांशी संपर्क साधल्याने वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या फौजफाट्याने घटनास्थळ गाठून चोरट्यांचा माग काढला. मात्र रात्री उशीरापर्यंत चोरटे हाती लागले नव्हते. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासणी मोहिम हाती घेतली असून त्यात तीन चोरटे असल्याचे बोलले जाते. दरम्यान पवार नेहमी याच पध्दतीने पैसे घेवून बाजारात येत होते. चोरट्यांनी पाळत ठेवून अथवा पाठलाग करून हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.