नाशिक – शहरात चेनस्नॅचिंगच्या घटना वाढत असून त्याला रोखण्यासाठी सराफ व्यावसायिकांची भूमिका अतिशय मोलाची आहे. सराफ व्यावसायिकांनी एकमताने चोरीचे सोने खरेदी न करण्याचे ठरविल्यास बहुतांश चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा बसेल, असे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सराफ व्यावसायिकांना बजावले आहे.
सराफ व्यावसायिक आणि पोलिस यांच्यातील सुसंवाद बैठक पोलिस आयुक्तालयात मंगळवारी झाली. त्यावेळी पोलिस आयुक्त बोलत होते. या बैठकीत सराफ व्यावसायिकांनी त्यांच्या विविध सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. त्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
बैठकीला उपायुक्त (गुन्हे) संग्रामसिंह निशाणदार, अमोल तांबे, विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, अजय शिंदे, सराफ असोसिएशनचे राजेंद्र दिंडोरकर, गिरीष नवसे, राजेंद्र ओढेकर, रमेश वडनेरे, सागर आडगावकर, मयूर शहाणे, किशोर कोळेकर, राहूल महाले, योगेश दंडगव्हाळ, सुनिल महालकर, शामराव बिरारी आदी उपस्थित होते.
शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळणार
सराफ बाजारात चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावा, अशी मागणी सराफ व्यावसायिकांनी केली. त्यास आयुक्तांनी होकार दर्शविला. मात्र, सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरच परवाना दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचे सराफ व्यावसायिकांनी स्वागत केले.
सराफ व्यावसायिकांनी केल्या या मागण्या
- सराफ बाजारात अग्निशमन, पोलिस यासह अन्य महत्त्वाची वाहने जाऊ शकतील, अशी व्यवस्था व्हावी.
- पोलिस व सराफ यांची दर ३ महिन्याला आढावा बैठक व्हावी
- गर्दीच्या वेळी सराफ बाजारात पोलिसांची पायी पेट्रोलिंग व्हावी
- मनपा व पोलिस यांनी संयुक्तरित्या अतिक्रमण काढावे
- चोरीची वस्तू विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकावर कारवाई करावी