नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस आणि विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चीनला जोरदार इशारा दिला आहे. सर्वांकडून आम्हाला मैत्रीची अपेक्षा आहे, हा आमचा स्वभाव असून आम्हाला दुर्बल समजण्याची चूक करू नका, शक्ती प्रदर्शन करून भारताला कोणतेही राष्ट्र घाबरवू शकत नाही, असा इशारा त्यांनी चीनला दिला आहे.
सैन्यातील देशभक्ती आणि पराक्रमावर सर्वांना अभिमान आहे. देशाच्या संयमी धोरणांवरून चीनने हे लक्षात घ्यावे की हा आधीचा भारत नसून नवा हातात आहे, जशाच तसे उत्तर देण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत असा इशारा त्यांनी यावेळी दिला. संघाच्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी स्वयंसेवकांसह संपूर्ण राष्ट्राला संबोधित केले. कोरोनाच्या महामारीमागे चीनचे नाव समोर येते. भारताच्या सीमाभागात चीनने गैरव्यवहार केला आहे. विस्तारवादी स्वभाव असणाऱ्यांचे अनेकदा इतरांशी पटत नाही अशा शब्दात त्यांनी चीनला टोला लगावला आहे. भारताने केलेल्या प्रहारामुळे चीन मागे हटले आहे. जगातल्या इतर देशांना यामुळे शिकवण मिळाली असल्याचे ते म्हणाले. अधिक सावधानता बाळगत सर्वांशी मैत्री करून राहणे आवश्यक आहे. चीनला जैसे थे उत्तर देण्यास सैन्य सक्षम असल्याचे ते यावेळी म्हणाले.