लखनौ (उत्तर प्रदेश) – पिलभीत इथल्या बिलसंडाच्या मरौरी खास गावात भाजपशी संबंधित सरपंचाच्या पतीनं बिसरपूरच्या सीओंवर एका मंदिराच्या व्यवस्थापकाचे नाक रगडून नमस्कार करायला लावल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण भाजप आमदार रामसरन वर्मांकडे गेल्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. अपर मुख्य सचिव, डीजीपी, एडीजी, डीआयजी आणि डीएम, एसपी यांना फोन करून कार्यकर्त्यांच्या अपमानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वर्तमान सरपंचानं रात्रीच प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आमदार वर्मा यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बिलसंडाच्या एएसपींनी पोलिस ठाण्यात पोहोचून रात्रीच जबाब नोंदवून घेतला. ज्या मंदिरात घटना घडली, त्या मंदिराच्या व्यवस्थापकांनीसुद्धा सरपंचांच्या पतीविरुद्ध कब्जा करण्याचा आरोप केला आहे.
सीओ विनित सिंह मंदिरांची पाहणी करण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक रवींद्र कुमारसुद्धा होते. सरपंचांचे पती संजीव अवस्थी यांचा आरोप आहे, की दुपारी त्यांना त्यांच्याच क्षेत्रातील मढानाथ मंदिरमध्ये पोलिसांनी बोलावलं. ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलिस निरीक्षकांशी बोलू लागले.
दुसरीकडे सीओ मंदिराचे व्यवस्थापक गुड्डू यांच्याशी बोलत होते. बोलणं संपल्यानंतर सीओंनी अवस्थी यांना बोलावलं आणि शिवीगाळ करत ग्रामसमाजाच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप लावला. अवस्थी यांनी आरोपांना फेटाळलं, त्यामुळे सीओ संतापले. व्यवस्थापक गुड्डू यांच्या पायाला नाक रगडवून नमस्कार करायला भाग पाडलं, असा आरोप केला. विरोध केल्यास खोट्या प्रकरणात गोवून कारागृहात टाकण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर अवस्थी तिथल्या आमदारांकडे पोहोचले. घटना ऐकून आमदारही संतापले. याविरोधात प्रशासनापर्यंत तक्रार करण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे.
मेनका गांधींकडून डीएमना फोन
संजीव अवस्थी यांच्या अपमानाची बातमी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनीसुद्धा डीएम, एसपी यांना फोन केला. डीएमनी त्वरित पोलिस निरीक्षकांना फोन करून घटनेचा अहवाल मागवला. मेनका गांधी यांनी सीओंना फोन करून त्यांच्या व्यवहाराबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र सीओंनी असं काही केल्याचा नकार दिला.