नाशिक – शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पुर्नवसनासाठी शासन कटिबध्द असून, देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली अशा शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी मंत्री बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले आदि उपस्थित होते.
यावेळी ताडमेदला जंगल क्षेत्रामध्ये चितागुफा पोलीस स्टेशन, सुकमा जिल्हा छत्तीसगढ येथे माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात शहीद झालेले जवान नितीन पुरुषोत्तम भालेराव यांना विरमरण आले असून त्यांच्या कुटूंबियांना शासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या एक कोटीच्या मदतीचे धनादेश वीर जवानाची पत्नी रश्मी नितीन भालेराव व आई भारती पुरुषोत्तम भालेराव यांना आज मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
तसेच मालेगाव तालुक्यातील साकोरी झाप येथील शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांना ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेतंर्गत नियंत्रण रेषेच्या पूर्व लदाख येथील अतिउच्च भागात कार्यरत असतांना श्योक नदीत बुडल्यामुळे विरमरण आले होते. त्यांच्या कुटुंबास शासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या एक कोटीच्या मदतीचे धनादेश आज मंत्री श्री.भुसे व मंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते वीर जवानाची पत्नी सारिका सचिन मोरे, वडील विक्रम मोहन मोरे व आई जिजाबाई विक्रम मोरे यांना प्रदान करण्यात आले.
त्याचबरोबर जम्मू काश्मिर येथील नियंत्रण रेषेवर ऑपरेशन रक्षक मोहिमेतंर्गत अतिउच्च ठिकाणी कार्यरत असतांना खराब हवामानामुळे जवान विजय काशीनाथ निकम हे शहीद झाले होते. त्यांच्या पत्नी अर्चना विजय निकम यांनाही शासनाने जाहिर केलेल्या रुपये 25 लाखाचा धनादेश आज त्यांना सुपूर्त करण्यात आला.