गेल्या सहा महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. या व्यवसायावर कोट्यवधी जण अवलंबून आहेत. १ पर्यटक आला की किमान १० जणांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होतो. या उद्योगाकडे सरकार गांभिर्याने पाहणार आहे की नाही
– दत्ता भालेराव (संचालक,कोकण पर्यटन, नाशिक)
आज तब्बल ६ महिने झाले आम्ही सर्व मंडळी घरातच बसून आहोत. सर्वांनीच एक जबाबदार पर्यटन व्यावसायिक म्हणून ही भूमिका अतिशय सुंदर पार पाडली. त्यात अगदी कोरोना लाॅकडाऊन काळ असो वा निसर्ग वादळातही आंम्ही मंडळीनी बऱ्याच आवश्यकता असलेल्या किंबहुना आपल्या परिचयाच्या गावात यथाशक्ती मदतही केली. व पुन्हा एकदा जबाबदार पर्यटन व्यावसायिक ही व्याख्या शतशः खरी ठरवली.
अनलॉक १,२,३, ४… सगळं झालं तरी पण सरकार काही टुरिझम इंडस्ट्री कडे सकारात्मक नजरेने पाहण्याची तयारी दाखवत नाही अस वाटायला लागलंय…. एक एक करत सर्व ऑफिसेस, सर्व प्रकारची दुकाने सगळं काही पूर्ववत चालू झालं… कृषी, आयटी, औद्योगिक सगळं व्यवस्थित चालू झालं . अगदी दारू दुकानेपण सुरु झाली, पण मंदिरे बंद. या सगळ्या बरोबर भारताच्या एकंदर GDP च्या ९.२% म्हणजेच जवळपास १७ लाख कोटी इतके जबरदस्त हातभार लावणाऱ्या इंडस्ट्री बद्दल सरकार एवढं निद्रिस्त का? आज या इंडस्ट्री मधील लाखो लोक बेरोजगार झाले आहेत त्याचं काय?
बरं त्या कोरोना मुळे सर्वात आधी बंद होणारी व सर्वात उशिरा चालू होणारी ही टुरिझम इंडस्ट्री अजून किती दिवस संयम ठेवणार. तसेच या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या लाखो व्यक्ती व कुटुंबांचं काय… गाडी, ड्रायव्हर, क्लीनर, त्यांना लोन देणाऱ्या कंपन्या, टोल, मंदिराबाहेरचे हार, फूलवाले, दूकाने, इन्शुरन्स, चहा, नाष्टा, जेवण पुरवणारे हाॅटेल्स, गावकरी, गाईड म्हणून काम करणारे, राहण्यासाठी उभारलेल्या कॅम्प साइट, होम स्टेज, पर्यटनावर अवलंबून असलेली त्या त्या ठिकाणी असलेली विविध प्रकारची दुकाने, लीडर म्हणून जबाबदारीने सहल नेणारी मंडळी, आयोजक, ऑफिस स्टाफ व त्यांचे कुटुंब, ऑफिस चालवण्यासाठी लागणारे समाजातील इतर घटक, फॉरेस्ट किंवा इतर एन्ट्री फी अशा एक ना अनेक लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व उद्योगांना सरकारतर्फे असंख्य सवलती / फंड मिळाले पण पर्यटन उद्योगाचे काय?
गेल्या २ महिन्यात दारूची दुकाने चालू झाली, पानटपऱ्या चालू झाल्या, रेस्टॉरंट पार्सल स्वरूपात चालू झाली, सर्व प्रकारचे व्यवसाय चालू झाले पण मग जिम् किंवा ट्रेकिंग का नाही? हाॅटेल चालू पण स्विमिंग पूल बंद. मंदिर बंद.
तसं पहायला गेलं तर जिम, ट्रेकिंग या मुळे तुमची तब्येत चांगली राहते. प्रतिकार शक्ती वाढते, फुफ्फुसांचा व्यायाम होतो, स्वच्छ हवा मिळते असे एक ना अनेक फायदे आहेत. अर्थातच सर्व नियम पाळून…
जर सरकारचे सर्व नियम पाळून मंदिरे, ट्रेक चालू होणार असतील तर त्यात गैर ते काय? आता बरेच अती शहाणे लोक प्रश्न विचारतील की जर दर्या खोऱ्यात कोरोना गेला तर कोण जबाबदार? त्या लोकांना माझा एक सोपा प्रश्न आहे की, डोंगर दर्यात जाण्यासाठी गावात किंवा घरात न जाता बाहेरूनच तो डोंगर, जंगल, किल्ला सर केला तर नक्की काय प्रॉब्लेम आहे. गावातील लोक नोकरीसाठी गावाबाहेर जात नाहीत का? त्यावेळी तर जास्त धोका आहे. जसं इतर व्यवसाय नियमबद्ध करून चालवता येतात तसेच ट्रेक किंवा टूर सुध्दा करता येतात. कारण एक जबाबदार सहल संचालक/ट्रेक ऑर्गनायझर हा प्रत्येक गोष्ट “safety first” या तत्त्वानेच करतो. यात काही शंका असल्यास बाचकळ कमेंट टाकण्यापेक्षा मला डायरेक्ट फोन करावा ही नम्र विनंती.
या आठवड्यात बऱ्याच गावात फोन झाले… खूप गावकऱ्यांची पण इच्छा आहे की ट्रेकिंग चालू करावं… पाहिजे तर आम्ही पॅकबंद जेवण गावाबाहेर आणून देऊ अशीही उत्तरे आली. गावातील ज्यांचं पोट व्यवस्थित भरलेले आहे त्यांचा मात्र विरोध अशी दुहेरी कात्रीत ग्रामस्थ सुध्दा सापडले आहेत.
मागील काही वर्षात या पर्यटन उद्योगाला अनेक संकटाना सामोरं जावं लागलंय. अगदी पूरग्रस्त परिस्थिती, सरकारचे टॅक्स मधील कायद्यातील बदल, सततच्या इंधन वाढीमुळे झालेली महागाई, साहसी पर्यटनावर निघालेला जाचक जीआर, जागतिक मंदी. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे कोरोना. या कोरोनामुळे तर जे पूर्णवेळ पर्यटनावर अवलंबून आहेत ते तर किमान ५ ते ६ वर्ष मागे फेकले गेलेत. अर्थातच हे सगळं पूर्ववत व्हायला काही वर्ष नक्कीच लागणार आहेत. पण आम्ही सगळे पुन्हा राखेतून जन्म घेतोय. आम्ही म्हणजे तुमची आमची आपल्या सर्वांचा पर्यटन उद्योग.
सर्व सहली/ट्रेक ला जाणाऱ्या सहभागी लोकांनां विनंती की तुम्ही ज्यांच्या सोबत ऑर्गनायझर ग्रुप बरोबर जाणार आहेत ते रजिस्टर आहेत की नाही, सुरक्षतेच्या दृष्टीने ऑर्गनायझर जवळ सर्व साहित्य आहे का?, पूर्वीचा अनुभव काय?, कोरोनाच्या दृष्टीने नियम पाळत आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर मगच त्या ऑर्गनायझर बरोबर सहल/ ट्रेक करा. लक्षात ठेवा सुरक्षित सहल/ट्रेकिंग हा तुमचा अधिकार आहे.
या सर्वांचा विचार करता एक मात्र खरे आतापर्यंत पर्यटकांनी व हितचिंतकांनी सर्वांनी जी भक्कम साथ दिली ती इथून पुढेही मिळेल यात काडीमात्रही शंका नाही. संपूर्ण सुरक्षितता घेऊन पुन्हा एकदा नव्या दमाने देश-विदेशात, डोंगर दर्यात , भटकायला आम्ही सर्व तयारीनिशी सज्ज आहोत.