मुंबई/नाशिक – नाशिकहून मुंबईकडे रात्रीच्या सुमारास इनोव्हा कारमधून निघालेले विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या कारला शहापूर येथील पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या कारसह वाहनांचा चक्काचूर झाला असून मिसर आणि त्यांचे सुरक्षारक्षक बालंबाल बचावले आहेत. तशी माहिती मिसर यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसर हे नाशिक येथून त्यांच्या खासगी ईनोव्हा कारमधून (एम.एच१५ डी एम ३९३७) मुंबईच्या दिशेने रात्री दहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक यांना घेऊन मार्गस्थ झाले. शहापूर पुलावर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणारी महामंडळाची शिवशाही बस दुभाजक तोडून विरुध्द बाजूला मुंबई लेनवर येऊन उलटली. त्यामुळे या लेनवरून मार्गस्थ होत असलेला कंटेनर त्या बसवर जाऊन आदळला आणि या दोन्ही वाहनांचा अचानकपणे झालेल्या अपघातामुळे मिसर यांच्या कारच्या चालकाचेही नियंत्रण सुटले मात्र त्याने शेवटपर्यंत प्रयत्न करत कारचा वेग आटोक्यात आणला तरीही कार कंटेनर आणि पुलाच्या कठड्याच्या मध्ये जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिसर यांच्या कारसह कंटेनरचा चक्कचुर झाला. दैव बलवत्तर असल्याने या भीषण अपघातातून मिसर व त्यांचे सुरक्षारक्षक आणि कारचालक थोडक्यात बचावले आहेत.