नवी दिल्ली – गेले वर्षभर कोरोनाच्या सावटाखाली काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह सर्वच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कोरोनामुळे जानेवारी ते जुलै २०२० आणि जुलै डिसेंबरपर्यंत कर्मचार्यांना महागाई भत्ता दिला गेला नाही. आता जानेवारी ते जुलैपर्यंत ४ टक्के महागाई भत्ता दिला जाईल.
सरकारनं महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्याचा परिणाम होणार आहे. बेसिक पगारानुसारच पीएफ आणि ग्रॅच्युएटी कपात होते. तसंच नवी तरतुदीनुसार सीटीसीमध्ये मूळ पगार ५० टक्क्यांपेक्षा कमी नसला पाहिजे.
महागाई भत्ता वाढल्यानंतर निवृत्तिवेतनधारकांनाही त्याचा फायदा होणार आहे. निवृत्तिवेतनधारकांना १० हजार निवृत्तिवेतन मिळत असेल, तर आता त्यांना १६ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळेल. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन कामगार कायदा लागू होऊ शकतो.
नव्या कायद्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फरक पडू शकतो. सध्या कर्मचाऱ्यांना १७ टक्के दरानं महागाई भत्ता मिळतो. तो जानेवारी २०२० मध्ये लागू करण्यात येणार होता. परंतु कोरोनामुळे जानेवारी २०२१ पर्यंतचा डीए रद्द करण्यात आला. आता वाढीव दरानुसार कर्मचाऱ्यांना २१ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. १ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची आशा सरकारी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.