अमरावती – येत्या १ मे पासून नागपूर ते शिर्डी प्रवास समृद्धी महामार्गावरुन करणे शक्य होणार आहे. या मार्गाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे. सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. ठाकरे म्हणाले की, आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं काम आपण केलेलं असेल. आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही.