‘समाज कल्याण’च्या घरकुल योजनेचा रहिमतपूर पॅटर्न
शासनाकडून लोककल्याणासाठी असंख्य योजना राबविल्या जात असल्या तरी त्या योजना राबवणाऱ्या यंत्रणा या जितक्या सक्षम पणे काम करतात तितकाच त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळतो. तसेच शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित कृतीसंगम केल्यास निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होतो. त्यासाठी शासकीय सर्व यंत्रणांनी प्रयत्न केल्यास अशक्य अशा गोष्टी देखील सहज शक्य होतात हे रहिमतपूर येथील घरकुल योजनेच्या पॅटर्न वरून दिसून येते.
– शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण, पुणे
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या हद्दीत वार्ड क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती लोकांची मोकळ्या जागेत बेघर वस्ती होती. सदर बेघर वस्तीच्या लोकांना शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊन अनुसूचित जातीच्या वस्तीचा विकास करण्याचा निर्धार समाजकल्याण विभागाने केला व त्या दृष्टीने पावले उचलले. एक पाऊल पुढे येत सर्वतोपरी प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीत सदर अनुसूचित जातीच्या घटकांचा वस्तीचा विकास करायचा या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली आणि पाहता पाहता प्रथम पहिल्या टप्प्यात 41 व नंतर 7असे 48 कुटुंबांना या रमाई घरकुल योजनेतून घरकुले मंजूर करणेत आली. सर्वे नंबर1330/2मधील34गुंठे जागेवर१४३५.८ चौरस मीटर जागेवर बांधकाम सुरू झाले. त्यातून 269 चौरस फूट प्रत्येक सदनिकाचा आकार निश्चित करण्याचे ठरविले गेले. ग्राउंड प्लस 2 अशी तीन मजली सुंदर इमारत उभी राहिली. सुमारे एक कोटी 56 लाख रुपये बांधकामावर खर्च करण्यात आलाय त्यातील समाज कल्याण च्या रमाई योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास दीड लाख रुपये याप्रमाणे 62 लाख रुपये सामाजिक न्याय विभागाने निधी उपलब्ध करून दिला तर नगर परिषद प्रशासनाने 13 वा आयोगाच्या तरतुदीतून 80 लाख उपलब्ध करून घेतले.
विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सामाजिक न्याय विभागाने नगरपरिषदेला सुमारे सव्वादोन कोटी रुपये मंजूर करून दिले. त्यातून सदर वस्तीच्या बाजूला संरक्षक भिंत व पेव्हिंग ब्लॉक, आदर्श विदयालय ते बेघरवस्ती ओढयावर पूल, आदर्श विदयालय ते बेघरवस्ती इमारतीपर्यंत खडीकरण व डांबरीकरण, आदर्श विदयालय ते बेघरवस्ती इमारतीपर्यंत कव्हरसह आर.सी.सी. गटर आणि आदर्श विदयालय ते बेघरवस्ती इमारतीपर्यंत पाणीपुरवठयासाठी 2 लाख लिटर पाण्याची टाकी व पाईपलाईन या कामांना मंजूरी देणेत आली.
सदर जागा नगरपरिषदेने उपलब्ध करून दिल्यामुळे व नगर परिषद व समाजकल्याण विभागाच्या योजनांचा एकत्रित रित्या लाभ दिल्यामुळे एखाद्या वस्तीचा रूपांतर कायापालट कशा पद्धतीने होऊ शकतो याचा नवीन आदर्श दोन्ही विभागाने घालून दिलेला आहे. त्याचे उदाहरण रहिमतपूर येथे पहावयास मिळत आहे. सदर बेघरवस्ती चा योजनेच्या माध्यमातून झालेला कायापालट हा राज्यासाठी निश्चितच पायलट प्रोजेक्ट करू शकतो. त्यातून राज्यातील विविध शहरात झालेला बकालपणा निश्चितच दूर होण्यास मदत होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या घरकुल योजने बरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास वस्ती कार्यक्रमातून एखादा झोपडपट्टीचा झालेला हा विकास हा निश्चितच राज्यासाठी पथदर्शक ठरू शकतो. सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री मा. धनंजय मुंडे, राज्यमंत्री मा. डॉक्टर विश्वजीत कदम, प्रधान सचिव मा. श्याम तागडे, आयुक्त मा. डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक आयुक्त श्री रवींद्र कदम पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळेच आज रहिमतपूर येथे अनुसूचित जातीच्या वस्तीचा कायापालट झालेला आहे.
सदर घरकुल योजनेचा भूमिपूजन 2015 मध्ये तर लोकार्पण आज दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी झाले आहे. निराधार दारिद्र रेषेखालील कुटुंबांना आपली घरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितच समाज कल्याण विभागाने उचललेले हे पाऊल कौतुकास पात्र असून इतर ठिकाणीदेखील याचा आदर्श घेऊन असे प्रकल्प राबविल्यास निश्चितच राज्यातील शहर झोपडपट्टीमुक्त होण्यास मदत होणार आहे.