पुणे – समाज कल्याण कर्मचारी संघटनेच्यावतीने २७ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात होणारे लेखणीबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तशी माहिती समाज कल्याण कर्मचारी संघटना गट क चे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच सचिव व आयुक्त यांच्यासोबत २८ जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. मंत्र्यांच्या विनंतीस मान देऊन आपले नियोजित आंदोलन आपण दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय संघटनेच्या राज्य कार्यकारणीने घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. थोड्याच वेळापूर्वी गुगल मीट व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये संघटनेचे पदाधिकारी तसेच विभागीय पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे म्हणाले की, संघटनेच्या आंदोलनात राज्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. बुधवारच्या बैठकीमध्ये संघटनेच्या न्याय व आग्रही मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीत जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुढे आंदोलन सुरू करण्याचा पर्याय संघटनेने खुला ठेवलेला आहे. असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.