अशी घोषणा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
मुंबई – राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत ‘सफेद चिप्पी’ ( sonneratia alba) या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
आज (७ ऑगस्ट) दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
याच बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. हा विषय अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याची सूचनाही दिली. मानव- वन्यजीव सहजीवन विकसित करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास केला जावा, यासाठी एक परिषद घेऊन एकत्रित विचारातून हा मार्ग निश्चित करावा असेही सांगितले.
शाश्वत विकास हवा
प्रस्तावित पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राकडे तत्वत: सहमती दर्शविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राखीव वन आणि जंगले यासंदर्भात प्रस्ताव सादर करतांना, एखाद्या क्षेत्राला राखीव क्षेत्र घोषित करतांना प्रकल्प आणि जनमत मॅच होते का याचा देखील अभ्यास केला जावा. पर्यावरणाची किंमत मोजून, जंगलाचे नुकसान करून प्रकल्प राबविण्याचे कोणेतेही सोपे मार्ग निवडण्यात येऊ नयेत म्हणूनच जेंव्हा अकोला-खांडवा मिटर गेज रेल्वेलाईनचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याच प्रस्ताव आला तेंव्हा मेळघाट मधून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग बदलण्याचे राज्याचे मत केंद्र शासनाला कळविण्यात आले. हा पर्यायी मार्ग निवडल्यास वाघ व वन्यजीवांचे सरंक्षण तर होईलच त्याचबरोबर बरीच नागरी वस्ती कव्हर होईल आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळू शकेल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मेळघाट व्याघ्र राखीव मधून जाणाऱ्या अकोला ते खांडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात परिवर्तन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाला आपले मत कळवले होते. त्यांच्या या मताचे समर्थन करतांना राज्य वन्यजीव मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज एकमुखाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी याचपद्धतीने नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करतांना तो किती जंगलाला प्रभावित करतो, तिथे एलिव्हेटेड ट्रेन करणे शक्य आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात वाघांची जपणूक होत आहे पण त्याचबरोबर जलचरांकडेही वन विभाग लक्ष देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात सुंदर वनसंपदेप्रमाणे समृद्ध जलसृष्टी ही आहे. आपण त्याकडे कसे पहातो हे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सागरतटावर कांदळवने देत असलेल्या नैसर्गिक सुरक्षेचा अभ्यास करण्याची सुचना दिली.