अलिगढ – स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवली, कष्टांची तयारी असेल तर या जगात काहीच कठीण नाही. आमिर कुतुब याचे उदाहरण आपल्याला याचाच दाखल देते.
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या आमिरला लहानपणापासून अभ्यासात फारशी काही आवड नव्हती. तरीही त्यांनी इंजिनियरिंग केले. त्यानंतर स्टुडंट व्हिसावर ते ऑस्ट्रेलियाला गेले, आणि तेथे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. तिथे गेल्यावरही जेव्हा पैशांची चणचण जाणवली तेव्हा त्यांनी एअरपोर्टवर सफाई कामगार म्हणून तसेच पेपर टाकण्याचे देखील काम केले. हे सगळं करतानाही आमिर याने स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले नाही.
यथावकाश त्याने एक कंपनी सुरु केली. हळूहळू काम वाढत गेले आणि आज त्यांच्या कंपनीची उलाढाल १० कोटींच्या घरात आहे. एवढेच नाही तर चार देशांमध्ये त्यांच्या कंपनीच्या शाखा आहेत.
आमिर यांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची लहानपणापासून इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी ते इंजिनिअर झाले, पण त्यात काही त्यांचे मन रमले नाही. त्यांना वेबसाईट डिझाईन करण्यात रस होता. फ्री लान्सिंग म्हणून ते हे काम करत होते. त्यांचे काही क्लायंट ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेत होते.
ऑस्ट्रेलिया मध्ये सुरुवातीच्या काळात संघर्ष करत असताना त्यांना एक माणूस भेटला. आमिर यांनी त्याचे काम करून दिले. यामुळे त्याचे दरमहा पाच हजार डॉलर्सची बचत झाली. त्यानंतर त्यांना अनेक कामं मिळत गेली. आणि यातूनच त्यांची उलाढाल १० कोटीवर गेली आहे. आज त्यांच्या कंपनीत १०० कायमस्वरूपी आणि ३०० कंत्राटी कामगार आहेत.