नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच धरतीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी देवीचा नवरात्रौत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
भाविकांची गर्दी वाढल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नवरात्रौत्सवात गडावर कावड घेऊन येणाऱ्या भाविकांनाही बंदी घालण्यात आली आहे. यंदा कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. तसेच यंदा दर्शनात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या विश्वस्तांनी सांगितले आहे. यामुळे भाविकांना घरबसल्या दर्शन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रौत्सव काळात पुजाऱ्यांकडून दरवर्षीप्रमाणे पार पडणार देवीचे पूजा विधी आणि इतर धार्मिक विधीवत होणार आहेत.
ऑनलाईन दर्शन मिळणार
कोरोना या जागतिक महामारीमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन अहोरात्र प्रयत्न करून या महामारीचा सामना करत आहे. येत्या १७ तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे यंदा हा उत्सव आपण साजरा करू शकत नाही; मात्र भाविकांची श्रद्धा लक्षात घेता विश्वस्त मंडळाने सोशल मीडिया, दूरचित्रवाणीद्वारे देवीचे दर्शन ऑनलाईन सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
ते आज मौजे सप्तश्रृंगी गड येथे झालेल्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या वर्षीचा नवरात्रोत्सव कसा असावा याबाबत नियोजन बैठकित अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी विकास मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसीलदार बी.ए. कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकरी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, रोप वे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुम्बा, उपसरपंच राजेश गवळी, विश्वस्त मंडळाच्या उपसमिती सदस्य विपुल गुरव, अजय दुबे, संदीप बेनके, सूरज बत्तासे, तुषार बर्डे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे आजार नियंत्रण कायद्यातील तरतुदी लक्षात घेता यावर्षीची नवरात्रोत्सव यात्रा रद्द करण्यात येत आहे. या काळात सप्तश्रृंगी देवीचे मंदिर पूर्णतः बंद असेल तसेच विश्वस्त संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवा भाविकांसाठी उपलब्ध नसतील. ज्योत, कावड घेऊन येणाऱ्या भाविकांसह होणारे धार्मिक उपक्रम विश्वस्त संस्थेच्या वतीने उपलब्ध होणार नाही. विश्वस्त संस्था आणि स्थानिकांनी चैत्रोत्सव साजरा करताना केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषांचे तंतोतंत पालन करत प्रशासनास योग्य सहकार्य केले होते; त्याच धर्तीवर नवरात्रोत्सव दरम्यान भगवती मंदिरात घटस्थापना, पंचामृत महापुजा, दैनंदिन आरतीपुजा, शांती पाठ, अलंकार यांचे पुजन पुजारी आणि कर्मचारी वर्गामार्फत करताना कोव्हीड १९ च्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी नमूद केले.
भाविकांच्या धार्मिक भावनांचा विचार लक्षात घेता विश्वस्त संस्थेने ऑनलाईन दर्शनाची सुविधा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच दूरचित्रवाणीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवरात्र उत्सव रद्द झाल्याबाबत भाविकांचे प्रबोधन करावे. या कालावधीत गडाकडे जाणारे वाहन रस्ते व इतर तीन पर्यायी पायी मार्ग बंद करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी चर्चेत सहभागी होताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले, पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व रस्ते व मार्गावर कावड धारक आणि ज्योत वाहक या भाविक वर्गाला प्रबोधन करून गडावर न जाण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले.