कळवण – सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी ट्रस्टने नांदुरी घाट रस्त्यादरम्यान असलेल्या कमानी जवळील बंद पडलेल्या टोल प्लाझा येथे दर्शन पासची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी व घाट मार्गावर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी आता हे ठिकाण बदलण्यात आले आहे. ऑफलाई दर्शनाचे हे पास आता मौजे सप्तशृंगगड येथे ग्रामपालिका टोल नाका येथे उपलब्ध होणार आहेत. गुरुवार (२६ नोव्हेंबरपासून) हे पास उपलब्ध होतील, असे ट्रस्टने सांगितले आहे.
कोविड – १९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन गडावर केले जात आहेत. त्यानुसार प्रत्येक तासाला ३६० भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यात पायी मार्गावरील २४० आणि रोपवे मार्गावरील १२० भाविकांचा समावेश आहे. त्यामुळे दररोज ५ हजार ७५० भाविकांना भगवतीचे दर्शन होत आहे. सदर ऑफलाईन दर्शन पास प्रक्रियेत भाविकांचे नाव, संपर्क क्रमांक, भाविक संख्या, नोंदणी वेळ व संभाव्य दर्शनाची संधी (वेळ) तसेच थर्मलगनद्वारे भाविकांच्या शरीराचे तापमान तपासले जात आहे. सदर दर्शन पास हा पायी मार्गे व रोपवे माध्यमातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.
एसटीच्या प्रवाशांना येथे मिळणार पास
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून गडावर येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्त संस्थेचे पहिली पायरी येथिल देणगी कार्यालयात सदर दर्शन पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकाला प्रवास मार्गाचे तिकीट संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.