नाशिक – अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ने आता सप्तरंगी सदरांचा वाचनीय खजाना आणला आहे. रविवार (३० ऑगस्ट) पासून दररोज वाचकांना वैवध्यपूर्ण लेख वाचायला मिळणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर हे ‘तरंग’ या लोकप्रिय सदरातून वाचकांच्या भेटीला येत आहेत. दर रविवारी ते ‘राजकीय, आर्थिक, सामाजिक विषयांवरचे भाष्य’ करणार आहेत. तर, एमईटी कॉलेजच्या व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रसाद जोशी हे ‘स्टार्टअप की दुनिया’ या अनोख्या सदराद्वारे ‘स्टार्टअपच्या जन्माची भन्नाट कहाणी’ वाचकांसमोर आणणार आहेत.
ज्ञानगंगा घरोघरी पोहचविणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीतील ठळक घडामोडींवर दर मंगळवारी ‘मुक्तांगण’द्वारे दृष्टीक्षेप टाकणार आहेत ज्येष्ठ माध्यमकर्मी संतोष साबळे. रोजच्या बातम्यांच्या धबडग्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या अनेकांच्या नजरेत येत नाहीत. त्यांच्या परिचय करुन देणारे ‘अपिरिचित’ हे सदर गुंफणार आहेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे. ‘दुर्लक्षित पण अनोख्या चेहऱ्यांची ओळख’ दर बुधवारी ते वाचकांना करुन देतील.
‘काव्य जगताची अनोखी सफर’ दर गुरुवारी घडवणार आहेत ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक. ‘नाशिक आणि परिसरातील घडामोडींचा परखड परामर्श’ घेणारे ‘नाशिक दर्पण’ हे सदर दर शुक्रवारी वाचकांच्या भेटीला येणार असून त्याचे लेखन ज्येष्ठ पत्रकार गौतम संचेती करणार आहेत. तर, पर्यावरण आणि संरक्षण क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेणारे ‘निसर्गरक्षणायन’ हे अनोखे सदर प्रसिद्ध होणार आहे दर शनिवारी. या क्षेत्राचे अभ्यासक भावेश ब्राह्मणकर हे त्यांच्या लेखणीतून वाचकांना तृप्त करतील.
ही सर्व वाचनीय सदरे वाचकांना लोकप्रिय इंडिया दर्पण लाईव्ह वर वाचायला मिळणार आहेत. तेव्हा खालील लिंकला भेट देण्यास दररोज विसरु नका
https://indiadarpanlive.com/
सुंदर