लखनऊ (उत्तर प्रदेश) – गावात सनी लिओनी आली आहे आणि सारे लोक कोरोनाच्या भितीने दरवाजा बंद करून घरात बसले आहेत, असे चित्र भारतात तरी शक्य नाही. नियम, कारवाई, पोलीस वगैरे या सर्व गोष्टी सनी लिओनीपुढे अत्यंत लहान आहेत, असे मानणारा भारतातील तिचा चाहता वर्ग आहे. याची प्रचिती अलीकडेच लखनऊ येथील आशियाना परिसरात आली.
बुधवारी रात्री येथील चान्सलर क्लबमध्ये ‘जोश अॅप‘चे लॉन्चिंग आणि मेगा टॅलेंट शोसाठी सनी लिओनी दाखल झाली होती. सनी येणार याची बातमी काही सेकंदांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि आसपासच्या गावांमधील लोकही तिच्या दर्शनासाठी येऊन पोहोचले. आणि मग काय जे व्हायचे तेच झाले. कोव्हीड प्रोटोकॉलची ऐशीतैशी.
यात सर्वांत मोठी गंमत म्हणजे कार्यक्रमस्थळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी देखील सनी लिओनीच्या अदा बघण्यात दंग झाले. कोव्हीड प्रोटोकॉल नावाची कुठली गोष्ट अस्तित्वात आहे, याचा त्यांनाही विसर पडला. संपूर्ण राज्यात बोंब झाल्यावर येथील पोलीस निरीक्षकाने कार्यक्रमात नियमांचे योग्य पालन झाल्याचा दावा केला. पण त्यात काही तथ्य नव्हते.
