लासलगांव – कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ औरंगाबाद नाशिक महामार्गावर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले होते. लासलगाव पोलीस प्रशासनाने कलम १४९ अन्वये आंदोलन करतांना नोटीस बजावण्यासाठी विंचूर येथे गेले असता आंदोलनकर्त्यांनी नोटीस न स्विकारल्यामुळे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने सदाभाऊ खोत, शिवनाथ जाधव, ज्ञानेश्वर तासकर, सचिन दरेकर, धनंजय जोशी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी व कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विंचुर येथे आदोलन करण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता तसेच मास्क न लावता जमाव संघटित करून नाशिक औरंगाबाद राज्य महामार्ग येथे रास्ता रोको करण्यात आला. कलम १४४(१)(३) अन्वये जमाव बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही म्हणून या प्रकरणी १४३, ३४१, १८८, २५९, २७० व आपत्ती व्यवस्थापन २००५ च्या कलम ५१ (ब) साथ रोग प्रतीबंधक अधिनीयम प्रमाणे सदाभाऊ खोत, शिवनाथ जाधव, ज्ञानेश्वर तासकर, बाबासाहेब पोटे, सचिन दरेकर, अनिल बोचरे, शंकर दरेकर, दिपक पगार, धनंजय जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.