नाशिक – थोर वारसा लाभलेल्या नाशिक महानगरातील रहिवाश्यांच्या समस्यांकडे राज्य शासन व महानगरपालिका सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले असून सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना अनाथ केले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस निखील सरपोतदार यांनी केला आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव भयजनक पातळीवर वाढत आहे. आजघडीला देशात सर्वात अधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात ठाणे, पुणे, मुंबई नंतर आता नाशिकचा नंबर लागत असून कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा व मनपा प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलेले असून राज्याची धुरा ज्यांच्या हातात आहे असे राज्यकर्ते मात्र करमणूक क्षेत्रात रमलेले आहेत, मग ते सुशांत सिंघ राजपूत असो की कंगना रानौत असो. राज्यातील गरीब कष्टकरी जनता आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी जीवावर उदार होऊन संघर्ष करीत आहे तेव्हा राज्यकर्ते आपल्या अहंकाराच्या पोषणासाठी लुटु-पुटुच्या लढाईत व्यस्त आहेत, असे सरपोतदार यांनी म्हटले आहे.
जागतिक कोरोना महामारी विरोधात सुरु असलेली लढाई कोरोना प्रतिबंधक औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडर व वेन्टीलेटर यांच्या तुटवडा व काळाबाजारामुळे जनतेला मृत्युच्या दाढेत घेऊन चाललेली असतांना मनपातील सत्ताधारी मात्र पेस्ट कंट्रोलचा ठेका, सफाई कामगार भरतीतील भ्रष्टाचार, मनपातील विविध कामांचे ठेके मिळवणे आदींमध्ये गुंतलेले आहेत. रस्त्यांना पडलेले खड्डे, जागोजागी घाणीचे साम्राज्य, पावसाच्या पाण्याचा भराव, बकाल झोपडपट्ट्या, आरोग्य सेवांचा वाजलेला बोजवारा सारख्या समस्यांनी नाशिककर भांबावलेले असतांना मनपातील सत्ताधारी मात्र देशात स्वच्छता परीक्षणात नाशिकच्या आलेल्या चमत्कारिक ११ व्या स्थानाचे ढोल बडवीण्यात मशगुल आहेत, असा आरोप सरपोतदार यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेला भुलून नाशिककरांनी त्यांच्या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून दिले मात्र नाशिककरांच्या भल्याचे कुठले काम ह्या आमदारांनी केले असा प्रश्न आज जनतेला पडला आहे. आपल्या सत्ताकाळात आदरणीय राजसाहेबांच्या स्वप्नातील शहर विकासाच्या रुपरेखेनुसार अनेक पथदर्शक विकासकामे करून देखील नाशिकच्या जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विकासाच्या राजकारणाला नाकारले होते. दुर्भाग्याने आज त्याच जनतेला आपल्या या निर्णयाचे कटू परिणाम भोगावे लागत आहे असे सांगून “सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना अनाथ केले आहे” अशी टीका सरपोतदार यांनी केली आहे.