मुंबई – कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो आहे. विनोदी अभिनेता सतीश कौशिक यांनाही आता कोरोनाच लागण झाली असून सध्या ते मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत ते रुग्णालयातच राहणार आहेत.
आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती सतीश कौशिक यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत जे लोक आपल्या संपर्कात आले होते, त्यांनीही टेस्ट करून घ्यावी असे आवाहन कौशिक यांनी केले आहे. मी सध्या घरीच क्वारंटाईन झालो आहे, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश कौशिक यांना घरी श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
सतीश कौशिक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण त्यांच्या सेक्रेटरीने सांगितले की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.