सटाणा – केंद्र सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता कांदा निर्यात बंदी केली आहे. निर्यात बंदी ही शेतकर्यांना संपविण्याचा घाट असून कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी यासाठी सटाणा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाला कांदे मार आंदोलन छेडण्यात आले.
सटाणा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने बुधवारी (१६ सप्टेंबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालयासमोर कांदा निर्यात बंदी केल्याच्या निषेर्धात केेंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कांदे मारो आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शहरध्यक्ष किशोर कदम यांनी केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार बहीरम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना आणि लॉकडाऊन मुळे शेतकरी व शेती व्यवस्था पूर्णपणे डबघाईस गेली आहे. शेतमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नसतांना द्राक्ष, डाळींब, भाजीपाला कवडीमोल भावाने विकली जात आहेत. कांद्याला भाव मिळू लागला असतांना केंद्र सरकारने निर्यात बंदी करून शेतकर्यांच्या अन्नात माती कालवली आहे. यामुळे केेंद्र शासनाने तातडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनात शहरध्यक्ष किशोर कदम, रविद्र पवार, विकास बोरसे, अनिल पाटील, मनोज ठोळे, राहुल पाटील, शरद पवार, प्रल्हाद पाटील संजय गरूड, गंगाधर चव्हाण, तुळशिराम माळी,बबलू शेख, आदी सहभागी झाले होते.