सटाणा – शहरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता चार दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान हा कर्फ्यू राहणार आहे. तशी घोषणा सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली आहे.
शहरात करोना बाधितांच्या संख्येत गेल्या तीन दिवसांत तब्बल ३८ रुग्ण वाढले आहे. तर तालुक्यातही ६२ रुग्णांची भर पडली आहे. शहरात चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येथील न्यायालयात ३ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, व्यापारी व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.
सटाणा शहर व परिसरात रविवारी १३ कोरोना बाधित आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू घोषित करण्याची मागणी मनसेचे पंकज सोनवणे व मंगेश भामरे यांनी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात सामाजिक अंतर ठेवुन शहरातील व्यापारी, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व पत्रकार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंगळवार ते शुक्रवार सलगपणे चार दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील मेडीकल सेवा वगळता उर्वरित सर्व व्यवसायांसह अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. रस्त्यावर पुर्ण शुकशुकाट असावा यासाठी जनतेने देखिल घराबाहेर पडू नये असा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बाजार समितीही बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे सोमवार (२४ ऑगस्ट) पासून बाजार समितीमधील सर्व शेतमालाचा लिलाव पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. तशी माहिती बाजार समिती सचिव भास्कर तांबे यांनी दिली.