सटाणा : येथील साहित्यायन संस्थेचे सदस्य, अहिराणी व मराठी कवी, लेखक अॅड.सोमदत्त मुंजवाडकर यांनी ग्रामीण भागातील स्त्रिया आणि शेतकर्यांच्या जीवनावर लिहीलेल्या गीतांचा ‘रानचिमण्या’ व्हिडिओ अल्बम प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अल्बमच्या १२ सुश्राव्य गीतांचे ऑडिओ व म्युझिक रेकॉर्डिंग नाशिक येथील फिदरटच स्टुडिओमध्ये झाले असून बागलाण तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या व्हिडिओ चित्रीकरण सुरू आहे.
गेल्या तीस वर्षांपासून विविध काव्य आणि लेखन करणार्या साहित्यिक अॅड.मुंजवाडकर यांची या व्हिडिओ अल्बमद्वारे गीतकार म्हणूनही नवी ओळख निर्माण झाली आहे. वसंतभारती प्रॉडक्शनतर्फे प्रदर्शित होणार्या या गावरान गीतांच्या व्हिडिओ अल्बमद्वारे अॅड.मुंजवाडकर यांनी ग्रामीण भागातील नवीन कलावंतांना संधी दिली आहे. दिपाली जाधव यांनी या अल्बमची निर्मिती केली असून प्रल्हाद जाधव यांचे दिग्दर्शन आहे.
अल्बममधील सर्व गीते उदयोन्मुख गायक नीलेश जाधव यांनी स्वरबद्ध केली असून संगीतकार धनराज सोनवणे व विकास जाधव यांनी संगीत दिले आहे. त्यांनी लिहीलेल्या ५१ विविध कवितांचा ‘धुक्यातल्या पाऊलखुणा’ हा मराठी काव्यसंग्रह सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांची प्रस्तावना असून मलपृष्ठावर लोककवी प्रशांत मोरे यांची टिपणी आहे. प्रख्यात चित्रकार व गीतकार विष्णु थोरे यांनी मुखपृष्ठ तयार केले असून नाशिकच्या अक्षरबंध प्रकाशनातर्फे काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यासाठी त्यांना प्रा.शं.क. कापडणीस व प्रा.किरण दशमुखे यांचे मार्गदर्शनही लाभले आहे.
बालपणापासूनच कविता आणि लेखनाची आवड असलेल्या अॅड.मुंजवाडकर यांना सन १९९१ मध्ये महाविद्यालयीन जीवनापासून मराठी व अहिराणी भाषेतील कथा, कविता, ललीत, चारोळी लिहिण्याचा व्यासंग लागला. साहित्यायन संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनातून महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात साहित्यिकांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. १९९७ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘पस्तावा’ या राज्यातील पहिल्या अहिराणी चारोळी संग्रहाचे प्रकाशन कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर यांच्या हस्ते झाले होते. या चारोळींनी अनेक व्यासपीठे गाजवली. ‘सकाळ’ सह राज्यभरातील विविध वर्तमानपत्रे व दिवाळी अंकांमधूनही या चारोळ्या प्रसिद्ध झाल्या.
१९९५ मध्ये साहित्य कलायात्री पुणे यांच्या व्यासपीठावर जगदीश खेबुडकर, विंदा करंदीकर व मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते अॅड.मुंजवाडकर यांचा विशेष सन्मानही झाला आहे. ‘साहित्यायन’च्या अनेक काव्यसंमेलनात सहभागी असलेल्या राज्यभरातील विविध दिग्गज कवींचा सहवासही त्यांना लाभला असून २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘साहित्यायनी’ स्मरणिकेचे संपादनही त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन मराठी कवी, लेखक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.दिनकर दाभाडे यांनी अॅड.मुंजवाडकर यांची नाशिक जिल्हा सहसचिवपदी निवड केली आहे.