नाशिक – राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बुधवार ३ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते सकाळी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा नगरपरिषद व देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ट्रस्ट, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे भूमिपूजन झाले. दुपारी २.३० वाजता राज्यापाल यांचे हस्ते सुरगाणा तालुक्यातील भिंतघर (गुलाबगाव) येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथील गोशाळेस भेट देणार असून त्यानंतर नाशिककडे प्रयाण करतील.
नाशिक शहरातील सातपूर येथील नॅशनल ब्लाईंड असोसिएशनच्या संशोधन व प्रशिक्षण निवास केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास सायंकाळी ५ ते ६ या कार्यक्रमानंतर राज्यपाल शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब येथे मुक्काम करणार आहेत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ठेंगोडा येथे स्वागत
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे दोन दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर सटाणा तालुक्यातील ठेंगोडा हेलिपॅडवर आगमन झाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी श्री.कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे,आमदार दिलीप बोरसे, विशेष पोलिस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते.